मुंबई शिक्षक व पदवीधर,कोकण विभाग पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाची निवडणूक जाहीर

नवीमुंबई :- भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. यासाठी बुधवार, दि.26 जून 2024 रोजी मतदान होणार असल्याची अशी माहिती उपआयुक्त (सा.प्र.)कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी आज पत्रकार परिषदेद्वारे दिली.

भारत निवडणूक आयोगाकडून घोषित कार्यक्रमानूसार शुक्रवार, दिनांक 31 मे 2024 रोजी अधिसूचना जारी केली जाईल. या निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक 07 जून 2024 रोजी दुपारी 3.00 वाजे पर्यंत उमेदवारांना नामनिर्देशन पत्रे सादर करता येतील. उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी सोमवार, दिनांक 10 जून 2024 रोजी सकाळी 11.00 वाजे पासून केली जाईल. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत बुधवार, दिनांक 12 जून 2024 दुपारी 3.00 वाजे पर्यंत राहील. बुधवार, दिनांक. 26 जून 2024 रोजी सकाळी 8.00 ते सायं 4.00 या वेळेत या मतदारसंघांकरिता मतदान होईल. सोमवार, दिनांक 01 जुलै 2024 रोजी सकाळी 8.00 वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात होईल. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शुक्रवार दिनांक. 05 जुलै 2024 रोजी पूर्ण होईल, असे भारत निवडणूक आयोगाने कळविले आहे.

मुंबई शिक्षक मतदार संघ, मुंबई पदवीधर मतदार संघ व कोकण विभाग पदवीधर मतदार संघ या तीनही मतदार संघासाठी कोकण विभागीय आयुक्त हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राहतील. मुंबई शिक्षक मतदार संघ, मुंबई पदवीधर मतदारसंघ या दोन मतदारसंघासाठी मुंबई शहर व मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी आणि कोकण विभागाचे उपायुक्त (सामान्य प्रशासन) हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील. तसेच कोकण विभाग पदवीधर मतदार संघाकरिता ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी व कोकण विभागाचे उपायुक्त (सामान्य प्रशासन) हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील. अशी माहिती कोकण विभाग तथा सह. निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांनी यावेळी दिली.

आचारसहिंतेबाबत माहिती देताना उपआयुक्त अमोल यादव म्हणाले की, कोकण विभागात जिल्हास्तरावर आचारसंहिता स्थायी समितीची स्थापना करण्यात आली आहे, या समितीत जिल्हाधिकारी व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल. जिल्हास्तरावर तक्रार निवारण कक्ष, माध्यम प्रमाणीकरण व देखरेख समिती व भरारी पथक स्थापन करण्यात आली आहेत.

तालुकास्तरावर व्हिडीओग्राफी पथक तयार करण्यात आले असून, या पथकांमार्फत राजकीय पक्ष/लोकप्रतिनिधी यांच्या दौऱ्यादरम्यान आचारसंहितेचा भंग होणार नाही याबाबत पर्यवेक्षण करण्यात येत आहे.

विभागीयस्तरावर चोवीस तास चालू असलेला तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. विभागीय आयुक्त कार्यालयातील नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक 022 -27571516 असा आहे. जिल्हा नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. मुंबईशहर -022- 22664232, 8657106273, मुंबई उपनगर- 022 – 69403344, 08104729077, ठाणे- 022 – 25301740, 09372338827, पालघर – 02525 – 299353, 08237978873, रायगड- 02141 -222118, 8275152363, रत्नागिरी – 02352 – 222233, 07057222233, सिंधुदुर्ग- 02362 – 228847, 7498067835 असा आहे.

मुंबई शिक्षक व पदवीधर,कोकण विभाग पदवीधर मतदार संघात एकूण 1 लाख 77 हजार 32 मतदारांची नोंदणी

मुंबई पदवीधर मतदार संघात स्त्री 37 हजार 619 तर पुरुष 53 हजार 641 असे एकूण 91 हजार 263 मतदार आहेत. तर मुंबई शिक्षक स्त्री 10 हजार 849, तर पुरुष 3 हजार 666 असे एकूण 14 हजार 515 मतदार आहेत.त्याच प्रमाणे कोकण विभाग पदवीधर मतदार संघात स्त्री 74 हजार 575, तर पुरुष 1 लाख 2 हजार 442 असे एकूण 1 लाख 77 हजार 032 मतदार आहेत. दिनांक 28 मे 2024 रोजी नोंदणी होणाऱ्या पदवीधर मतदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

प्रसार माध्यमांनी निवडणूकीबाबत जनसामान्यांमध्ये जनजागृती करावी. असे आवाहन उपआयुक्त अमोल यादव, यावेळी यांनी केले. या पत्रकार परिषदेत उपआयुक्त (करमणूक)संजीव पालांडे, कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ.गणेश मुळे उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सफाई कर्मचारी महिलांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती

Wed May 29 , 2024
– जागतिक महिला आरोग्य दिनानिमित्त मनपाचा पुढाकार नागपूर :– नागपूर महानगरपालिकेद्वारे महिलांच्या आरोग्यासंबंधी जागृतीकरिता दहाही झोनस्तरावर जागतिक महिला आरोग्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी सर्व झोनचे झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा आरोग्य चमू आणि स्वच्छता विभागाच्या अधिका-यांमार्फत आरोग्याप्रति जनजागृती करण्यात आली. दरवर्षी २८ मे रोजी महिलांच्या आरोग्यकरिता जागतिक महिला आरोग्य दिवस साजरा केला जातो. ‘महिलांचे आरोग्य आणि अधिकार : एक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com