नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या सातव्या खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत रविवारी १२ जानेवारी २०२५ रोजी मॅरेथॉन व युवा दौड चे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (१२ जानेवारी) सकाळी ५ वाजता कस्तुरचंद पार्क येथून मॅरेथॉन आणि सकाळी ६.३० वाजता युवा दौडला सुरूवात होणार आहे. याशिवाय विदर्भ स्तरीय खो-खो आणि ॲथलेटिक्स स्पर्धेला सुद्धा रविवारी १२ जानेवा रोजी सुरुवात होणार आहे.
मॅरेथॉनमध्ये प्रवेशासाठी अंतिम तारीख १० जानेवारी असून या निर्धारित तारखेपूर्वी स्पर्धकांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक माजी महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.
१२ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ या कालावधीमध्ये खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत मॅरेथॉन आणि युवा दौडने महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. पुरूष, महिला आणि १६ वर्षाखालील मुले व मुली या गटामध्ये मॅरेथॉन तर ३ किमी अंतराची युवा दौड सर्वांसाठी खुली असणार आहे. दोन्ही स्पर्धांसाठी प्रत्येकी ५० रुपये प्रवेश शुल्क निर्धारित करण्यात आलेले आहे. युवा दौडमध्ये सहभागी प्रत्येक स्पर्धकाला मेडल्स, प्रमाणपत्र आणि टी-शर्ट प्रदान करण्यात येईल.
मॅरेथॉनमध्ये पुरूषांसाठी १० किमी, महिलांसाठी ५ किमी, १६ वर्षाखालील मुलांसाठी ५ किमी आणि १६ वर्षाखालील मुलींसाठी ३ किमी अंतर निर्धारित करण्यात आले आहे. चारही गटातील विजेत्यांना एकूण ३ लाख २८ हजार रुपयांचे रोख बक्षीस प्रदान करण्यात येणार आहेत. स्पर्धेसंदर्भात अधिक माहितीसाठी स्पर्धेचे सह निमंत्रक सचिन देशमुख (9766893380) व समन्वयक पारेंद्र पटले (9823531899) आणि शिवाणी दाणी (9860133860) यांच्याशी संपर्क साधावा.
रविवारी १२ जानेवारी रोजी मानकापूर स्टेडियममध्ये विदर्भ स्तरीय खो-खो स्पर्धेला सुरूवात होईल. सीनिअर पुरुष, महिला आणि १४ वर्षाखालील मुले व मुलींच्या गटात ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ३ लाख ६८ हजार रुपयांचे रोख पुरस्कार प्रदान करण्यात येतील. स्पर्धेसंदर्भात अधिक माहितीसाठी स्पर्धेचे सह निमंत्रक डॉ. पद्माकर चारमोडे (9823659655) आणि समन्वयक विनोद बघेल (9423405320) यांच्याशी संपर्क साधावा. रविवारपासूनच मानकापूर क्रीडा संकुलातील सिंथेटिक ट्रॅकवर ॲथलेटिक्स स्पर्धेला सुद्धा सुरुवात होणार आहे. खुला पुरुष व महिला गट तसेच १२ वर्षाखालील, १४ वर्षाखालील, १६ वर्षाखालील, १८ वर्षाखालील मुले व मुली आणि ३५ वर्ष वयोगटावरील गटामध्ये ही स्पर्धा होईल. स्पर्धेतील विजेत्यांना ७ लाख ९५ हजार ९०० रुपयांचे रोख पुरस्कार प्रदान करण्यात येतील. स्पर्धेसंदर्भात अधिक माहितीसाठी स्पर्धेचे सह निमंत्रक अशफाक शेख (9422127843) आणि समन्वयक अमर खोडे (9850644584) यांच्याशी संपर्क साधावा.