विविध क्षेत्रांबाबत महाराष्ट्र व बाडेन – वूटॅमबर्गमध्ये होणार सामंजस्य करार – मंत्री दीपक केसरकर

लाखो तरुणांना मिळणार नोकरीची संधी

स्टुटगार्ट :- कौशल्य विकास, शिक्षण, पर्यटन व सांस्कृतिक देवाण-घेवाण याबाबत महाराष्ट्राशी तातडीने सांमजस्य करार करण्यास जर्मनीतील बाडेन- वूटॅमबर्ग राज्य सरकार उत्सुक आहे. त्याचा फायदा महाराष्ट्रातील लाखो तरुणांना होईल आणि त्यांना जर्मनीत नोकऱ्यांची संधी मिळेल, अशी माहिती शालेय शिक्षण व मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

कौशल्य विकासासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आणि त्या माध्यमातून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे धोरण राज्य सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीकारले. त्या धोरणास मंत्री केसरकर यांनी गती दिली. त्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत, कौशल्य विकास व उद्योजकता विकासमंत्री मंगलप्रभात लोढा आणि उच्च शिक्षणमंत्री चंद्रकात पाटील यांचे सहकार्य मिळाले.

जर्मनीच्या दौऱ्यावर असलेले केसरकर यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे कौशल्य विकास प्रशिक्षण, पर्यटनाला चालना, जर्मन भाषा शिक्षण या महत्त्वाच्या विषयांवर सोमवारी (दि. १५) व मंगळवारी (दि. १६) तीन बैठकांमध्ये विविध मुद्दे मार्गी लावले. त्यातील चर्चेचे फलित म्हणून महाराष्ट्र व बाडेन- वर्टेमबर्ग राज्यांमध्ये लवकरच सामंजस्य करार केला जाईल. त्यासाठी बाडेन-वूटॅमबर्गच्या सरकारने राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना रीतसर आमंत्रित केले आहे. बाडेन-वूटॅमबर्ग जर्मनीतील सर्वांत संपन्न, औद्योगिकदृष्ट्या पुढारलेले राज्य आहे. त्याच्याशी महाराष्ट्राचे दीर्घ काळापासून संबंध आहेत. ते आता अधिक दृढ होतील, असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला.

मंत्री दीपक केसरकर म्हणाले, “भारताला महासत्ता बनविण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखविले आहे. ‘सेवाक्षेत्राच्या माध्यमातून कोट्यवधी भारतीय तरुण जगातील प्रगत देशांत जातील आणि आपल्या कामाद्वारे भारतीय संस्कृतीचा ठसा उमटवतील,’ असेच पंतप्रधानांना अपेक्षित आहे. त्यांचे हे स्वप्न बळकट करण्याचे काम महाराष्ट्र शासन करीत आहे. त्यातून महाराष्ट्रातील असंख्य तरुणांना नोकरीची संधी मिळेल.”

मंत्री दीपक केसरकर त्यांच्या समवेत असलेले वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी आणि मंगळवारी तीन महत्त्वाच्या बैठका झाल्या. स्टुटगार्ट व कार्ल्सरूह येथे झालेल्या या बैठकांना भारताचे महावाणिज्य दूत (दक्षिण जर्मनी) मोहित यादव, महाराष्ट्राचे शालेय शिक्षण खात्याचे प्रधान सचिव श्री. रणजितसिंह देओल उपस्थित होते. या महत्त्वाच्या बैठकांचे नियोजन जर्मनीतील मराठी उद्योजक ओंकार कलवडे यांनी केले.

स्टुटगार्टमध्ये आज सकाळी  केसरकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची बाडेन-वूटॅमबर्ग राज्य सरकारशी बैठक झाली. त्यास स्टेट मिनिस्टर डॉ. फ्लोरियान स्टेकमन, राज्याच्या शिक्षणमंत्री थेरेसा शॉपर व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. त्यात अल्पकालीन, मध्यमकालीन व दीर्घकालीन धोरणांवर सविस्तर चर्चा झाली. दोन्ही राज्यांमध्ये तातडीने कृतिदल सुरू करून, कौशल्य विकास, पर्यटन, शिक्षण, सांस्कृतिक देवाण-घेवाण याबाबतचे सामंजस्य करार केला जाईल. त्यातून मराठी तरुणांना मोठ्या प्रमाणात नोकरीची संधी मिळेल आणि जर्मनीतील मनुष्यबळाची कमतरता दूर होईल.

कौशल्य विकासासाठी जर्मनीचे सहकार्य

मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, तातडीने अंमलात आणण्याच्या धोरणामध्ये भारतीय तरुणांना कौशल्य विकासाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देणे व त्या माध्यमातून जर्मनीमधील मनुष्यबळाची कमतरता दूर करणे यावर चर्चा झाली. जर्मनीतील सर्वांत प्रगत बाडेन-वूटॅमबर्ग राज्यात मनुष्यबळाची कमतरता प्रकर्षाने जाणवत आहे. इलेक्ट्रिशियन, प्लंबर, हॉटेल मॅनेजमेंट, आरोग्य क्षेत्रातील नर्सिंगसह विविध टेक्निशियन आदी दैनंदिन गरजांच्या कामांसाठी जर्मनीत मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ हवे आहे. महाराष्ट्रातील शिक्षण संस्थांमधून कौशल्याचे प्रशिक्षण दिले जातेच. जर्मनीमध्ये आवश्यक असलेल्या कौशल्याची त्यात भर घातली जाईल. त्यामध्ये प्रामुख्याने नवे तंत्रज्ञान व जर्मन भाषेचे शिक्षण याचा समावेश असेल. त्यासाठी दोन्ही राज्यांच्या सरकारच्या नियंत्रणाखाली दोन सरकारमध्ये किंवा उद्योगांमध्ये करार केले जातील.

कुशल कामगारांना जर्मनीत काम करण्यासाठी व्यावसायिक प्रमाणपत्राची गरज असते. ते काम फ्रायबर्ग ( बाडेन- वूटॅमबर्ग) येथील संस्था करतील. त्यामुळे तरुणांना व्हिसा व जर्मनीत रोजगार मिळणे यात येणाऱ्या अडचणी दूर होतील, असे मंत्री केसरकर म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात १७५ तक्रारींचे निराकरण

Sat May 20 , 2023
मुंबई :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (शासन आपल्या दारी) कार्यक्रमात आज मालाड वेस्ट पी नार्थ वॉर्ड येथे १३२ तक्रारी प्राप्त झाल्या तर त्यामधील १०० तक्रारी जागीच निकाली काढण्यात आल्या.तसेच गोरेगाव वेस्ट पी साऊथ वॉर्ड येथे ७५ तक्रारी प्राप्त झाल्या असून सर्व तक्रारी जागीच निकाली काढण्यात आल्या तसेच ज्या तक्रारी प्राप्त होतील त्या देखील तातडीने सोडविण्याचे निर्देश महिला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!