– आयुक्तांनी केली ज्येष्ठ नागरिक मंडळांच्या प्रतिनिधींशी चर्चा
नागपूर :- राज्य शासनाद्वारे ज्येष्ठ नागरिकांना दैनदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री-वयोश्री योजेनाची संपूर्ण प्रक्रिया सुलभ व सरळ करण्यात आली असून, अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त सभा कक्षात बुधवारी (ता ४) ज्येष्ठ नागरिक मंडळांची बैठक पार पडली. बैठकीत अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्यासह २५ हून अधिक विविध ज्येष्ठ नागरिक मंडळांचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीत आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी ” मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन यात्रा योजना संदर्भात ज्येष्ठ नागरिक मंडळांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले की, राज्यातील ६५ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करण्याकरीता रु. ३०००/-चे अर्थसहाय्य मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत मिळणार आहे. याची पावती त्यांना मनपामध्ये जमा करायची आहे .
योजनेला ज्येष्ठ नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून, ज्येष्ठ नागरिकांना नोंदणी अर्ज भरण्यात अडचण जाऊ नये याकरिता मनपाद्वारे नोंदणीची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन यात्रा योजनेचे नोंदणी अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था मनपाच्या दहाही झोन कार्यालयात व मनपा मुख्यालयाती ज्येष्ठ नागरिक कक्षात करण्यात आली आहे.
तर मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे नोंदणी अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था मनपाच्या सर्व ५१ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रासह मनपाच्या दहाही झोन कार्यालय, प्रभाग निहाय, व आरोग्य वर्धिनी केंद्रावर करण्यात आली आहे. या केंद्रांवर दररोज नोंदणी अर्ज स्वीकारले जात असल्याचेही आयुक्तांनी सांगितले. तसेच ज्येष्ठ नागरिकांनी आप-आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाऊन वैद्यकीय तपासणी करुन मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घ्यावा व या योजनेकरीता अर्ज प्राथमिक आरोग्य केंद्रात भरुन द्यावा असे आवाहन ही आतुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
बैठकीत उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी योजनांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत पात्र ज्येष्ठ लाभार्थ्यांना चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इत्यादी उपकरणे खरेदीकरिता थेट अर्थसहाय देण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच मनपाद्वारे मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी आजवर १४ हजार ९७५ अर्ज वितरीत करण्यात आले असल्याचे सांगिलते.