– लॅपटॉपसह अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत
– लोहमार्ग पोलिस, आरपीएफची संयुक्त
नागपूर :- मौजमस्ती आणि व्यसन भागविण्यासाठी रेल्वेत मोबाईल चोरी करणार्या दोघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. अनिकेत विलासराव सव्वाशेरे (२९) रा. चक्रपाणी नगर आणि हरीलाल दीनदयाल कनोजिया (३५) रा. रिवा, मध्य प्रदेश अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून लॅपटॉपसह अडीच लाखांचे मोबाईल हस्तगत केले.
रेल्वेने करताना प्रवासी बर्थवर मोबाईल ठेवून फलाटावर चहाचा आस्वाद घेतात. तसेच स्टेशनवर चार्जिगसाठी लावलेला मोबाईल सोडूनही दुसरीकडे जातात. त्यामुळे चोरांना आयती संधी मिळते. याशिवाय गर्दीचा फायदा घेत मोबाईल आणि पर्सवर हातसाफ करतात. चोरीसाठी फार कल्पकता लागत नाही. महागड्या मोबाईलची कवडीमोल भावात विक्री करुन मिळालेल्या पैशावर मौजमस्ती करतात. अटकेतील आरोपीही यापैकीच अनिकेतने २१ ऑगस्ट रोजी नागपूर रेल्वे स्थानकावरून एका प्रवाशाच्या खिशातून मोबाईल चोरला. प्रवाशाच्या तक्रारीवरून लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. या प्रकरणाची आरपीएफने सुद्धा गंभीर दखल घेऊन स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात अनिकेतची भूमिका संशयास्पद वाटली. लोहमार्ग पोलिस आणि आरपीएफने संयुक्तरित्या कारवाई करून अनिकेतला ताब्यात घेतले. त्याच्या बॅगची घेतली असता दोन लॅपटॉप आणि पाच वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल आढळून आले. अधिक चौकशी केली असता दोन गुन्ह्यात एक लॅपटॉप आणि एक मोबाईल चोरी केल्याचे कबूल केले. आरोपीने रेल्वेगाडी आणि रेल्वे स्थानकामधून प्रवाशांचे मोबाईल चोरी केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दोन्ही अट्टल चोरट्यांकडून एकूण १४ मोबाईल, लॅपटॉप असा एकूण अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गौरव गावंडे यांच्या नेतृत्वात ऑज्वेल्ड थॉमस, संजय पटले, प्रवीण खवसे, पप्पू मिश्रा यांनी केली.
आरोपी सीसीटीव्हीत कैद
दुसर्या प्रकरणात आरोपी हरीलालने प्लॅटफॉर्म क्रमांक ३ मधून एका प्रवाशाचा मोबाईल केला. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास केला. चोरी करताना तो सीसीटीव्हीत कैद झाला. फुटेजच्या आधारे पोलिस हरीलाल पर्यंत पोहोचले. चौकशीत त्याने चोरीतील मोबाईल जावेद नावाच्या व्यक्तीकडे ठेवल्याचे सांगितले. त्याच्याकडून चार मोबाईल हस्तगत करण्यात आले. चौकशीत त्यांनी आणखी चार प्रकरणात मोबाईल चोरी केल्याचे कबूल केले.