-एमएलए कॅन्टिनचा लुक बदलणार
-महिला आमदारांसाठी व्हीआयपी कक्ष
नागपूर :-आमदार निवासात प्रवेश करताच एखाद्या पंचतारांकीत हॉटेलसारखा भास होतो. महानगरात किंवा विदेशातील हॉटलसारखी अंतर्गत सजावट, भिंतीवरील डिझाईन, लायटिंगचा इफेक्ट आणि भव्य दिव्य असे स्वरुप आमदार निवासाला देण्याचा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी केला. आकर्षक आणि देखण्या सजावटीने आमदार किंवा प्रशासकीय अधिकारीच काय सामान्य व्यक्तीही नक्कीच सुखावेल अशी कल्पकता वापरली आहे. हेच ते आमदार निवास, यावर कोणाचा विश्वास बसणार नाही.
आमदार निवास येथे आमदारांची व्यवस्था असते. त्यांच्यासोबत पीए आणि खास कार्यकर्ते सुध्दा असतात. मात्र, येथील खोल्या आकर्षक नसल्याने हिवाळी अधिवेशनासाठी येणारे काही आमदार खाजगी हॉटेल किंवा नातेवाईकांकडे थांबतात. त्यातही गेल्या दोन वर्षांपासून आमदार निवास आणि एमएलए कॅन्टीन ओसाड पडली होती. अलिकडेच बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी अवघ्या काही दिवसात आमदार निवासाचे रुप पालटले. एकंदरीत चेहरामोहराच बदलल्याने एकदा तरी आमदार निवासाला भेट द्यावी असे नागपुरकरांना वाटले.
बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संजय दशपुते यांच्या मार्गदर्शनात अधीक्षक अभियंता दिनेश नंदनवार, कार्यकारी अभियंता अभिजित कुचेवार आणि उपविभागीय अभियंता संजय उपाध्ये यांची कल्पकता आणि खाजगी आर्कीटेक्टच्या सहकार्यातून निर्माण झालेली आमदार निवास वास्तुविशारदचा एक उत्तम नमुना आहे. स्वागत कक्षात टफन ग्लास, एसीपी पॅनल, अत्याधुनिक झुंबर, लायटींग व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच आमदार निवास येथील एमएलए कॅन्टीनला मागील अनेक वर्षापासून गळती होती. गळतीच्या दुरूस्तीसाठी बरेच प्रयत्न झाले. गळती थांबविण्यासाठी कॅन्टीनचे नवीनीकरण करण्याचा निर्णय झाला. त्यासाठी पावनेतीन कोटींचा खर्च अपेक्षित होता. मात्र, बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी केवळ 65 लाख रुपयात कॅन्टीनचे नवीनीकरणासह गळती थांबविण्याचे काम हाती घेतले आहे. शिवाय या कामाचे आयुष्य पावनेतीन कोटी खर्चुन जेवढे असणार होते, तेवढेच 65 लाखांत राहणार आहे. यासोबतच अंतर्गत सजावटीवर 20 लाख रुपये खर्च करण्यात येत आहे. यात सभागृह, जनरल हॉल आणि मोठा सभागृहासह महिला आमदारांसाठी व्हीआयपी कक्ष तयार होत आहे. तसेच विंग एक ते चार चेही नवीनीकरण करण्यात येत आहे.
…चौकट…
दोन कोटींची बचत
एमएलए कॅन्टीनची गळती थांबविण्यासाठी पावनेतीन कोटींचा खर्च प्रस्तावित होता. मात्र, कल्पकता वापरल्याने केवळ 65 लाख रुपयात नवीनीकरण होत आहे. या कामाचे आयुष्य दहा वर्ष असेल. सोबतच आमदार निवासाला पंचतारांकीत हॉटेलसारखे रुप देण्यात आले आहे.
नितीन झोडे शाखा अभियंता सा.बा. विभाग
@ फाईल फोटो