नागपूर :- आज नागपुरातील सामाजिक न्याय विभागात मंत्री महोदयाची बैठक असल्याचे सांगून शेकडो विद्यार्थ्यांना गेट बाहेर ताटकळत उभे राहावे लागले. ह्यातील बहुतेक विद्यार्थी जाती पडताळणी समितीकडे आपला अर्ज व सुनावणीसाठी आले होते.
परंतु ह्या सर्व विद्यार्थ्यांना बिल्डिंग बाहेरील मुख्य प्रवेशद्वारावरच गार्डद्वारे अडविण्यात आले. साधारणतः 11 वाजेपासून तर 2 वाजेपर्यंत हे विद्यार्थी बाहेरच उभे होते.
मंत्री महोदयाकडे सुरक्षेच्या दृष्टीने सर्व फौज फाटा असताना त्यांच्या एका सभागृहात असलेल्या बैठकीसाठी दोन्ही बिल्डिंगला वेठीस का धरण्यात आले? हे कळायला मार्ग नाही. हे न्याय भवन ज्यांच्यासाठी आहे व मंत्री महोदय ज्यांच्यासाठी आले त्यांनाच मात्र दाराबाहेरच नव्हे तर परिसराबाहेर रोखण्यात आले.
जाती पडताळणी समितीच्या नावाखाली, शिष्यवृत्तीच्या नावाखाली, वस्तीगृहाच्या नावाखाली, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचा सरेआम छळ होत आहे अशी तक्रार बसपा नेते उत्तम शेवडे यांनी केली आहे.