रामटेक :- रामटेक येथील ताई गोळवलकर महाविद्यालयात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी सहायक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी आशित कांबळे प्रमुख उपस्थिती म्हणून आले असता त्यांनी सायबर सुरक्षेच्या संदर्भात महत्वपूर्ण माहिती देऊन डिजिटल फूट प्रिंट सारख्या विषयांबद्दल सांगत विद्यार्थ्यांना जागृत केले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित अभाविप च्या विकासार्थ विद्यार्थी गतिविधीचे राष्ट्रीय सहसंयोजक मयूर जव्हेरी यांनी राष्ट्रनिर्माणातील विद्यार्थ्यांची भूमिका मांडत अभाविपच्या ७५ वर्षातील प्रवासाची माहिती दिली. यादरम्यान नागपूर विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य तसेच समृद्धी को-ऑपरेटिव्ह बँक नागपूरचे संचालक वामन तुर्के यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. इ. स. १९४९ ला स्थापना होऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला यावर्षी ७५ वर्ष पूर्ण झाले असून या अमृत महोत्सवानिमित्त अभाविप कडून संपूर्ण देशभरात विविध विद्यार्थी केंद्रित गतिविधी राबवल्या जात आहे त्याचनिमित्ताने रामटेक शाखेकडून सुद्धा या कार्यक्रमाचे आयोजन झाले होते. या कार्यक्रमाचे संचालन श्रीवर्धन लोथे यांनी तर आभार मयुर लोहारे यांनी मांडले होते. दरम्यान अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे रामटेक नगराध्यक्ष डॉ.सुशील लोणकर तसेच मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, पालकवृंद व परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते.