– ठिकठिकाणांहून ‘अमृत कलश’ होणार रवाना
नागपूर :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रमांतर्गत नागपूर जिल्ह्यातील सर्वच 764 ग्रामपंचायतींनी उत्सफुर्त व सक्रीय सहभाग घेतला. या गावांमधून माती व तांदळाने भरलेले ‘अमृत कलश’ पुढील प्रवासासाठी तालुकास्तरावर पाठविण्यात येणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रम राबविण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यातही 1 ते 30 सप्टेंबर दरम्यान गावा-गावांमध्ये माती व तांदुळ गोळा करून ‘अमृत कलश’ तयार करण्यात आले. या उपक्रमाच्या पुढील टप्प्यात तालुकास्तरावर 1 ते 13 ऑक्टोंबर दरम्यान ग्रामपंचयतींकडून गटविकास अधिकारी हे पंचायत समिती कार्यालयात ‘अमृत कलश’ जमा करतील. यानंतर तालुक्यातून दोन युवकांची निवड करून मुंबईला हे अमृत कलश पाठविण्यात येणार आहेत.22 ते 27 ऑक्टोंबर दरम्यान राज्यातील सर्व तालुक्यातील कलश घेवून युवक मुंबई येथे गोळा होतील. यानंतर 28 ते 30 ऑक्टोंबर दरम्यान दिल्ली येथे मुख्य कार्यक्रमासाठी हे युवक रवाना होतील. 1 नोव्हेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देशभरातील ‘अमृत कलश’ महान हुतात्म्यांच्या स्मरणार्थ दिल्ली येथे मुख्य कार्यक्रमात वापरण्यात येणार आहेत.