नागपूर : राज्य राखीव पोलीस बलाचे केंद्र जळगाव जिल्ह्यातील वरणगाव किंवा आणि अहमदनगर जिल्ह्यातील कुसडगाव येथे सुरू करण्याबाबत संबंधित लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यासोबत जानेवारी महिन्यात बैठक घेऊन मार्ग काढला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.
विधानसभा सदस्य रोहित पवार यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारत राखीव बटालियनचे दोन केंद्र राज्यासाठी मंजूर झाले होते. त्यातील एक केंद्र कुसडगाव येथे करण्याची मागणी होती. मात्र असे केंद्र नक्षलवाद प्रभावी क्षेत्रासाठी असल्याने ते अकोला येथे करण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात जळगाव जिल्ह्यातील वरणगाव (ता. भुसावळ) येथे राज्य राखीव पोलीस बल केंद्र सुरू करण्याचा निर्णय झाला. नंतर हे केंद्र पुन्हा कुसडगाव येथे हलविण्याचा निर्णय झाला. सध्या हे केंद्र वरणगाव येथे करण्याचे प्रस्तावित असले तरी दोन्ही लोकप्रतिनिधी यांची भावना लक्षात घेऊन लवकरच संयुक्त बैठक घेऊन सर्वसमावेशक मार्ग काढण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
या चर्चेत सदस्य संजय सावकारे यांनी सहभाग घेतला.