यवतमाळ :- जिल्ह्यातील वणी, झरी, मारेगाव या तालुक्यात मिरची उत्पादक शेतकरी व त्या परिसरातील मृगझरी शेतकरी उत्पादक कंपनीच्या सहकार्याने मार्केट लिंकेज व विविध कृषिविषयक सुधारणांची उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने प्रभारी जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांच्या अध्यक्षतेखाली महसूल भवन येथे बैठक घेण्यात आली.
बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संतोष डाबरे, रुपिया फिनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी धवल शहा व आदित्य शहा, युरोपियन देशामधील कार्बोनेज कंपनीचे संस्थापक व्हॅक्लाव कुरेल, मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक टिकाराम कोंगरे, आरसीसीपीएल आणि बिर्ला सिमेंट कंपनीचे प्रतिनिधी विजय कांबळे, स्वयंसेवी संस्थेचे अधिकारी अभय मोघे, मनीष दवे, मृगझरी शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष बंडू पारखी, नेर शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष शंकर चव्हाण, घाटंजी आदिवासी शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, रखुमाई हळद उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी केशव कानवले, प्रशांत नायकवडी, देवानंद खांदवे उपस्थित होते.
जिल्ह्यातील वणी, झरी, मारेगाव या तालुक्यात मिरची उत्पादक शेतकरी व त्या परिसरातील मृगझरी शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या सहकार्याने जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविणे, माती तपासणीपासून जैविक कृषि निविष्ठा जसे खते, जैविक कीटकनाशक औषधीचा वापर करून पिकावर येणाऱ्या कीड व रोगाचे व्यवस्थापन करून जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढेल, उत्पादन खर्च कमी होईल तसेच उत्पादित शेतमाल कमाल रासायनिक अंशपातळीवर आणून शेतमाल देशविदेशामध्ये विक्री करणे हा उद्देश आहे. त्याअनुषंगाने सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
तंत्रज्ञान वापरामुळे कार्बनडाय ऑक्साईडचे उत्सर्जन कमी होण्यास मदत होणार असून जास्तीत जास्त सेंद्रिय कर्ब जमिनीमध्ये स्थिर होणार आहे. यामुळे शेतीची उत्पादकता वाढविण्यास मदत होणार असून संबंधित शेतकऱ्याला त्या बदल्यात प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. सदर उपक्रमाची अंमलबजावणी शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या सहकार्याने करण्यात यावी, अशा सूचना श्री.खंडागळे यांनी यावेळी केल्या. बैठकीनंतर उपस्थित मान्यवरांनी समता मैदान येथे आयोजित कृषी महोत्सवाला भेट दिली.