यवतमाळ :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने येथील सभागृहात मध्यस्थी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. व्ही. न्हावकर होते.
कार्यक्रमाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव के. ए. नहार तर प्रमुख वक्ते म्हणून आर. आय. सोनवने तसेच वकील मंडळी, विधी महाविद्यालयातील विद्यार्थी, पीएलव्ही व बँक कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रशिक्षित मध्यस्थ न्यायाधीश आर.आय.सोनवने यांनी मध्यस्थी काळाची गरज तसेच त्याचे सर्वतोपरी फायदे यावर मार्गदर्शन केले.
त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष एन. व्ही. न्हावकर यांनी मध्यस्थी प्रक्रियेबाबत उदाहरण देतांना सांगितले की, वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी प्रक्रिया खुप महत्वाची आहे. दोन्ही पक्षकारांमध्ये तडजोड करण्यासाठी प्रशिक्षित मध्यस्थ असणे आवश्यक आहे. मध्यस्थीमुळे दोन्ही पक्षकारामध्ये वाद हा सहजासहजी मिटू शकते. तसेच वकीलांनी पक्षकारांना मध्यस्थी मध्ये सामावून घ्यायला पाहिजे. मध्यस्थी प्रक्रियेमध्ये वकीलांची भुमिका खुप महत्वाची असते.
तडजोडीकरीता वकीलांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन मध्यस्थी प्रक्रियेमध्ये काम करावे व दोन्ही पक्षकारामध्ये तडजोड कशाप्रकारे होऊ शकते हे पाहावे. त्यामुळे मध्यस्थी प्रक्रिया प्रभावीपणे काम करु शकते, असे यावेळी त्यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनामध्ये सांगितले.
कार्यक्रमाचे आभार सचिव के ए. नहार यांनी मानले. संचलन ९ वे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर श्रीमती आर. एस. मोरे यांनी केले.