नागपूर :- राज्यात काही भागात गोवर (मीझल्स) ची साथ पसरत असल्याने महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे गोवर संसर्गापासून सुरक्षेच्या दृष्टीने नागपूर शहरातील बालकांच्या प्रतिबंधात्मक लसीकरण अभियानाची सुरुवात करण्यात आली असून या अभियानाला गती देण्यात येत आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभिनयासाठी ९३० पेक्षा अधिक आशा वर्कर्स दहाही झोन निहाय घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत आहेत. त्यानुसार आतापर्यंत १ लाख ८९ हजार ९४७ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यात ५ वर्षाखालील ५२४०६ बालकांची नोंद करण्यात आली असून शहरात १७ गोवर संशयीत बालके आढळली आहेत. या बालकांवर औषधोपचार सुरू असून पालकांनी आपल्या बालकांचे लसीकरण करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे.गोवर हा प्रामुख्याने लहान मुलामध्ये आढळणारा संसर्गजन्य आजार आहे. गोवरचे उच्चाटन करण्यासाठी मनपाद्वारे शहरातील 5 वर्षाखालील लहान बालकांचे गोवर डोज सुटले असल्यास किंवा काही कारणामुळे दिले गेले नसल्यास लसीकरण केले जात आहे. गोवरचा संसर्ग वाढत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने नागपूर शहरात बालकांच्या प्रतिबंधात्मक लसीकरणाची सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती मनपाचे साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांनी दिली आहे.
शहरात गोवर लसीकरण सर्वेक्षणामध्ये आतापर्यंत सर्वेक्षण झालेल्या १८९९४७ घरांमधील ५ वर्षाखालील १५४४ बालकांनी गोवर, रुबेलाचा पहिला तर १३४२ बालकांनी दुसरा डोस घेतला आहे आणि ३४९१ बालकांना ‘अ’ जीवनसत्वचे डोस देण्यात आले आहेत. यापैकी १३३५ बालकांनी पहिला आणि १३१४ बालकांनी दुसरा डोस घेतलेला नाही. या सर्व बालकांना मनपाच्या आशा सेविका आणि परिचारिकांद्वारे लस देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
शहरात आढळलेल्या १७ गोवर संशयीत रुग्णांपैकी ६ रुग्ण हे लकडगंज झोनमधील असल्याचे आढळले आहे. तर धरमपेठ झोनमधील ४, धंतोली झोनमधील ३, आशीनगर झोनमधील २, हनुमान नगर आणि गांधीबाग झोनमधील प्रत्येकी १ रुग्ण असल्याचे दिसून येत आहे. मनपाच्या आरोग्य चमूद्वारे संशयीत रुग्णांवर आवश्यक औषधोपचार सुरू असून परिसरातील बालकांच्या लसीकरणाला गती देण्यात आली आहे. गोवरच्या धोक्यापासून ५ वर्षाखालील बालकांचे लसीकरण होणे हे अत्यंत आवश्यक आहे. लसीकरणासाठी मनपाच्या ९३० पेक्षा जास्त आशा सेविका घरोघरी जाउन सर्वेक्षक करीत आहेत तर लसीकरणासाठी २५० पेक्षा जास्त एएनएम कार्यरत आहे. या सर्वेक्षणामध्येच बालकांना गोवर रुबेलाच्या लसीकरणाची माहिती देउन बालकांचे लसीकरण केले जात आहे शिवाय ‘अ’ जीवनसत्वाचेही लसीकरण केले जात आहे. नागरिकांनी गोवर लसीकरणासंदर्भात कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता वेळीच आपल्या ५ वर्षाखालील बालकांचे प्राधान्याने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.
गोवरची लक्षणे
ताप, सर्दी, डोळे लाल होणे, खोकला अशी सुरूवातीची लक्षणे असतात. त्यानंतर पुरळ उठायला सुरवात होते, ती कपाळा पासून व नंतर मान व हातपाय पर्यंत पसरते. गोवर हा गंभीर आजार आहे कारण हा इतर आजारांना निमंत्रण देतो. लहान मुलांना खोकल्याचा त्रास सुरु होतो व त्यामुळे घशाला सूज येते निमोनिया होऊ शकतो. गोवर झाल्यानंतर अ जीवनसत्व कमी होते त्यामुळे डोळ्याचे आजार होतात काही वेळा अंधत्व पण येते. कुपोषित बालकास हा आजार होण्याची जास्त शक्यता असते
काळजी घ्या, हे करू नका
गोवर झाल्यास बालकाला इतरांपासून वेगळे ठेवले पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी जाऊ देणे टाळा, बालकांना शाळेत पाठवू नये. कारण हा आजार अतिशय संसर्गजन्य आहे. ताबडतोब डॉक्टरांचा सल्ल्या घ्यावा, घरच्या घरी उपचार करू नये, कडू निंबाचा पाला किंवा इतर कोणतेही घरगुती उपचारात वेळ घालवू नये. सर्व डॉक्टरांनी गोवर सदृश लक्षणे असणाऱ्या सर्व बालकाची माहिती महानरपालिका आरोग्य विभागास देणे आवश्यक आहे.