मुंबई :- आज 1 एप्रिल आजपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु झाले आहे. या नवीन आर्थिक वर्षात काही नियम बदलण्यात आले आहे. तुमच्यावर परिणाम करणारे हे नियम आहेत. या बदलांमध्ये एलपीजी सिलेंडरपासून वाहनांच्या किंमतीपर्यंत बदल झाले आहे. या बदलाचा परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेली कर प्रणाली आजपासून लागू होणार आहे. पाहू या काय, काय झाले बदल…
एलपीजी सिलेंडर स्वस्त
आजपासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडर स्वस्त झाले आहे. या सिलेंडरचे दर 32 रुपये कमी झाले आहे. आता व्यावसायिक सिलेंडर दिल्लीमध्ये 1764.50 रुपयांना मिळणार आहे. कोलकातामध्ये 1879.00 रुपये तर मुंबईमध्ये 1717.50 रुपयांना हे सिलेंडर मिळणार आहे. घरगुती सिलेंडरच्या दरात काही बदल करण्यात आला नाही.
ईपीएफओचा नवीन नियम
कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (EPFO) फंड बॅलेन्ससाठी ऑटोमेटिक ट्रांसफर सिस्टम लागू केली आहे. जेव्हा तुम्ही नवीन नोकरीच्या ठिकाणी जातात तेव्हा मॅन्युअल फंड ट्रांसफर करावी लागते. परंतु आता ऑटोमेटीक प्रणालीने हे काम होणार आहे. तुमचा पीएफ बॅलेंस नवीन कंपनीत वर्ग होईल.
नवीन कर प्रणाली
1 एप्रिल 2024 पासून देशात नवीन टॅक्स सिस्टम डिफॉल्ट पर्याय होणार आहे. जर तुम्ही जुनी करप्रणालीचा स्वीकार केला नाही तर तुमचा टॅक्स कॅल्कुलेशन नवीन नियमाप्रमाणे होणार आहे. नुकत्याच सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पात कर प्रणालीत काहीच बदल केला नाही. 7 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असेल तर आयकर द्यावा लागणार नाही.
पेन्शनसाठी टू फॅक्टर ऑथन्टिकेशन
आजपासून, 1 एप्रिलपासून, PFRDA राष्ट्रीय पेन्शन प्रणालीसाठी अतिरिक्त सुरक्षा उपाय लागू होत आहे. पासवर्डद्वारे सीआरए प्रणालीमध्ये प्रवेश करण्यासाठी सिस्टममध्ये टू फॅक्टर ऑथन्टिकेशन लागू केले आहे.
ई-वाहनांना सबसिडी नाही
इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या FAME-2 योजनेला सरकार 31 मार्चनंतर वाढवणार नाही. या योजनेची मुदत वाढवण्याच्या वृत्ताचे खंडन करताना अवजड उद्योग मंत्रालयाने बुधवारी ही माहिती दिली.