संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– वाहनचालकासह, प्रिंटिंग प्रेस ,ढाबेचालकाना आले सुगीचे दिवस
कामठी :- मागील आठवडा भरापासून कामठी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून निवडणुकीच्या प्रचारासाठी आता अनेकांच्या हातात रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे.वाहनचालकासह प्रिंटिंग प्रेस,ढाबे चालकांना सुगीचे दिवस आले आहेत. एका उमेदवारांच्या प्रचारासाठी ऑटोरिक्षा,जिप,पिकअप, व छोटा हत्ती यासारख्या वाहनांना मागणी वाढली आहे.
20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक होणार आहे कामठी,मौदा,नागपूर ग्रामीण या तिन्ही तालुक्यातील मतदार संघात प्रचाराला वेग आला आहे.गावोगावी सकाळी सात वाजल्यापासून सर्वच पक्षाच्या उमेद्वारासह अपक्ष उमेदवाराकडून वाहनावर भोंगे लावून प्रचार केला जात आहे. ग्रामीण भागात रब्बीच्या पेरणीची धावपळ सुरू असली तरी गावात रामपहरी येणाऱ्या भोंग्यामुळे मतदारांची चांगलीच करमणूक होत आहे.सायंकाळी उशिरापर्यंत भोंग्याचा आवाज घुमू लागला आहे तर रात्रीच्या वेळी दिवसभर प्रचारामुळे आलेला थकवा भागविण्यासाठी ढाब्यावर ओल्या पार्ट्या झडत आहेत त्यामुळे ढाब्यावर प्रचंड गर्दी दिसून येत आहे.प्रचारासाठी आता केवळ अवघे काही दिवस उरले असल्याने प्रचाराला वेग दिला जात आहे.नाते गोते जवळ केली जात आहेत नमस्कार चमत्कार वाढले आहेत.मित्र व दूरच्या नातेवाईकांना ही आता विचारणा होऊ लागली आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने मतदार राजाला मान मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात बॅनर,होर्डिंग,पोम्पपलेटची छपाई केली जात असल्याने प्रिंटिंग व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे.सभा,कॉर्नर,बैठका, रॅलीसाठी मजुरांना आगाऊ रक्कम देऊन आणले जात असल्याने मजुरांच्या हाताला पुढील काही दिवस हक्काचे काम मिळत आहे. सभेसाठी लागणाऱ्या खुर्च्या,मंडप यांचेही बुकिंग झाल्याने बिछायत व्यवसायिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.निवडणुकीमुळे सर्वच स्तरातील छोट्या मोठ्या व्यवसायिकांना रोजगार मिळत असल्याचे चित्र आहे.