यवतमाळ :- दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय राठोड पाचव्यांदा मोठ्या मतांनी निवडून आले. त्यांच्या सोबत असलेला जनाधार व सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची कार्यपध्दती पाहता त्यांचा राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश करावा, या मागणीसाठी आज रविवारी दिग्रस येथून मोटरसायकल रॅली काढून पोहरादेवी (जि. वाशिम) येथे सामूहिक अरदास (प्रार्थना) करण्यात आली.
दिग्रस येथील शास्त्री नाईक पुतळ्याजवळ हजारो बंजारा समाज बंधू भगिनींनी एकत्र येऊन संजय राठोड यांचा राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश करावा, या मागणीसाठी मोटरसायकल रॅली काढली. आमदार संजय राठोड यांना मंत्रीपद देण्याची मागणी करून ‘संजय राठोड तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, च्या घोषणा देत दिग्रस ते पोहरादेवी मोटारसायकलने प्रार्थना रॅली काढली. पोहरादेवी येथे विदर्भातून आलेल्या शेकडो बंजारा समाजबांधवांनी नंगारा म्युझियमजवळ एकत्र जमून, दुपारी १२ वाजता नंगारा म्युझियम ते संत सेवालाल महाराज समाधीपर्यंत पायी यात्रा काढली.
लोकनेते व बंजारा समाजाचे नेते आमदार संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी बंजारा समाज बांधवांनी संत सेवालाल महाराज मंदिरात भोग लावून अरदास रूपाने प्रार्थना केली. संजय राठोड यांनी २०१४ मध्ये मंत्री होताच, पोहरादेवीचा न भूतो न भविष्यती असा कायापालट केला. संजय राठोड यांनी समाजाच्या विकासासाठी आवाज दिला, तेव्हा समाज बांधव एका ध्वजाखाली एकवटला. विकासापासून दूर राहिलेल्या पोहरादेवी या बंजाराकाशीचा विकास करण्याचे रामराव बापूंना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी सातत्याने सरकारकडे पाठपुरावा करत ७०० कोटींच्या वर निधी मंजूर करवून घेतला आणि पोहरादेवीचा कायापालट केला. बंजारा समाज संजय राठोड यांच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभा राहिला आहे. समाजाला एकवटून एका ध्वजाखाली आणण्याची ताकद केवळ आमदार संजय राठोड यांच्यात आहे, त्यामुळे बंजारा समाजाचे संत रामरावबापू यांनी त्यांना आशीर्वाद दिला. बंजारा समाजाचा आशेचा किरण असलेल्या कुशल नेतृत्वाला महाराष्ट्र शासनाच्या महायुती सरकारमधे मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी बंजारा समाज बांधवांनी भोग व अरदास कार्यक्रमाचे आयोजन करून प्रार्थना केली. या कार्यक्रमात बंजारा समाज समन्वय समितीच्या नेतृत्वात विदर्भ, मराठवाड्यातील बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
बंजारा समाजासह इतर १८ पगड जातींचा भक्कम पाठिंबा असलेल्या संजय राठोड यांना मंत्रिमंडळात सामील करावे, अशी मागणी यावेळी शेतकरी मारोती जाधव यांनी केली. महायुतीला संजय राठोड यांच्या माध्यमातून बंजारा समाजाची भक्कम साथ लाभली. त्याच संजय राठोड यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र संजय राठोड हे सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांची, विकासकामांची जाण असलेले नेते असल्यानेच ते पाचव्यांदा निवडून आले आहे. त्यामुळे त्यांना मंत्रीपद द्यावे अन्यथा या मागणीसाठी आंदोलन करावे लागेल, असा इशारा दिग्रस तालुक्यातील चिंचोली येथील शेतकरी मारोती जाधव यांनी दिला आहे.