Ø एमपीएससी युपीएससी च्या विद्यार्थ्यांना ‘सारथी’प्रमाणे अर्थसहाय्य
नागपूर :- महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचारसाहित्य समाजासाठी मार्गदर्शक व प्रेरक आहेत. महाज्योतीमार्फत त्यांचे एकत्रित समग्र वाङ्मय प्रकाशित करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा महाज्योतीचे अध्यक्ष अतुल सावे यांनी केले. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (महाज्योती) संचालक मंडळाची बैठक अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली यावेळी ते बोलत होते. महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले, संचालक प्रवीण देवरे, कंपनी सचिव अविनाश गंधेवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रशांत वावगे व संचालक मंडळाचे इतर सदस्य यावेळी उपस्थित होते.
एकत्रित समग्र वाङ्मयात महात्मा फुले यांनी लिहिलेली पुस्तके, निबंध,नाट्य, पोवाडा, टिपण्या, सत्सार अंक, काव्यरचना, पत्रव्यवहार, भाषणे, यासह विविध लेखनसाहित्य तसेच सावित्रीबाई यांनी महात्मा जोति बा यांना लिहीलेली पत्रे, भाषणे, बावन्नकशी सुबोध रत्नाकर व इतर साहित्य आणि भाषणे, तसेच महाज्योतीच्या योजना अशा 32 घटकांचा समावेश राहणार आहे.
यूपीएससी व एमपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण करून मुलाखत चाचणीस पात्र ठरलेल्या महाराष्ट्रातील भटक्या जाती, विमुक्त जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना सारथीच्या धर्तीवर 25 हजार रुपये व एमपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी परिक्षानिहाय 5 ते 15 हजार पर्यंत अर्थसहाय्य करणे. एमबीए, सीएटी, सीईटीच्या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थींची मर्यादा 500 वरून 750 करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
पीएचडी छात्रवृत्ती योजनेतील विद्यार्थ्यांना घरभाडे भत्ता मंजूर करणे, प्रत्येक विभागस्तरावर महाज्योतीच्या प्रादेशिक कार्यालयासाठी जागा घेणे, विविध प्रशिक्षण योजनेत समाजिक प्रवर्गनिहाय रिक्त जागा भरण्याबाबत धोरण निश्चित करणे, शासनाने मान्यता दिलेल्या आकृतीबंधानुसार मंजूर पदे भरणे, प्रशिक्षणासाठी आणि कार्यालयातील कंत्राटी व रोजंदारीवर शिक्षक व इतर तांत्रिक मनुष्यबळ नियुक्तीसाठी मंजूरी देणे, महाज्योतीमार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी संस्थांची निवड करण्याचे धोरण निश्चित करणे आदी बाबींवर यावेळी चर्चा झाली. या शिवाय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या मौजे नायगाव येथे त्यांच्या जन्मदिनानिमित्त विविध शैक्षणिक उपक्रम व कार्यक्रम राबविण्यासाठी 10 लक्ष इतका निधी बैठकीत मंजूर करण्यात आला.
व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले सादरीकरणाद्वारे माहिती दिली. याप्रसंगी मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते महाज्योतीच्या जेइइ, नीट, एमएचटी-सिईटी योजनेतील विद्यार्थ्यांना टॅब व सीम तसेच कौशल्य विकास प्रशिक्षणात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना रोजगार पत्राचे वाटप करण्यात आले. प्रारंभी व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षण घेणाऱ्या शिकावू पायलट यांनी अतुल सावे यांचे स्वागत केले.बैठकीला महाज्योतीचे अधिकारी उपस्थित होते.