पणजी :- गोव्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र संघाने आतापर्यंत 180हून अधिक पदके जिंकली असून लवकरच पथकांच्या द्विशतकाचा टप्पा पूर्ण होईल, असा निर्धार महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस नामदेव शिरगावकर यांनी गोवा येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
“महाराष्ट्र संघाला आजपर्यंत पावणेदोनशे पथकांच्या पलीकडे पोहोचता आले नव्हते. म्हणूनच यंदा आम्ही या स्पर्धेसाठी जय्यत तयारी केली होती. किंबहुना प्रथमपासूनच पदकांचे द्विशतक गाठणे, हेच आमचे मुख्य ध्येय होते आणि त्या दृष्टीनेच खेळाडूंची योग्य निवड त्यांना योग्य रीतीने मार्गदर्शन भरपूर सुविधा आणि सवलती हे धोरण आम्ही राबविले होते. त्यामुळेच यंदा आम्हाला हे विक्रमी यश मिळत आहे,” असेही शिरगावकर यांनी सांगितले.
गतवर्षी गुजरा मध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आम्हाला पथकांच्या तालिकेत दुसरा क्रमांक मिळाला होता आणि त्यावेळी सेनादलाने सर्वाधिक सुवर्णपदके जिंकून प्रथम स्थान मिळवले होते. त्यांच्या खेळाडूंना मागे टाकायचे हे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवत आमच्या खेळाडूंनी स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासूनच सर्वोच्च यश मिळवण्यास सुरुवात केली होती. पदकांचा शतकांचा टप्पा आमच्या खेळाडूंनी चौथ्या दिवशीच पार केला. आता या दोन दिवसातच हे द्विशतकही पूर्ण होईल. आतापर्यंत मॉडर्न पेंटॅथलॉन, पिंच्याक सिलेट, मल्लखांब, जिम्नॅस्टिक्स, जलतरण, इत्यादी क्रीडा प्रकारांमध्ये आमच्या खेळाडूंनी पदकांचा खजिनाच लुटला आहे. सुमारे २६ वर्षानंतर महाराष्ट्राला वॉटरपोलोमधील पुरुष गटात विजेतेपद मिळाले आहे. योगासने, खो-खो कबड्डी इत्यादी काही खेळ अजून बाकी आहेत त्यामध्ये महाराष्ट्राला अधिकाधिक पदके जिंकण्याची संधी आहे.
“महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य मिनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. बऱ्याच वर्षांनंतर ही स्पर्धा आयोजित केल्यामुळे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. या स्पर्धेतील नैपुण्यवान खेळाडूंचा शोध घेऊन त्यांना योग्य रीतीने प्रशिक्षण देण्यात आले त्याचाही फायदा येथील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदक मिळवण्यासाठी झाला आहे,” असेही शिरगावकर यांनी सांगितले.
शिरगावकर पुढे म्हणाले की, “आमच्या या यशामध्ये कोमल जगदाळे, संजीवनी जाधव, दत्तू भोकनळ यांसारख्या अनेक ग्रामीण भागातील खेळाडूंनी मोठा वाटा उचलला आहे. सांघिक खेळांमध्ये देखील महाराष्ट्राच्या अनेक ग्रामीण भागातील खेळाडूंनी एकत्र येऊन सराव केला त्यामुळेच महाराष्ट्राला चांगले यश मिळवता आले आहे. यंदा महाराष्ट्रात संघाच्या पथक प्रमुख पदाची जबाबदारी आंतरराष्ट्रीय रोईंगपटू, पंच व संघटक स्मिता शिरोळे यादव यांच्याकडे देण्यात आली आहे. एखाद्या राज्याचे पथक प्रमुखपदाची जबाबदारी एखाद्या महिला खेळाडूकडे देणे हा अतिशय दुर्मिळ योग आहे. त्याचाही सकारात्मक परिणाम महिला खेळाडूंच्या कामगिरीवर दिसून आला आहे.”
“पुढची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा उत्तराखंड राज्यात होणार आहे. त्यासाठी आत्तापासूनच आम्ही तयारी सुरू केली आहे. ६० टक्के कृती आराखडा तयारही करण्यात आला आहे. आमचे लक्ष्य केवळ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांपुरते मर्यादित नसून पुढील वर्षी पॅरिस येथे आयोजित केल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंना पदके कशी मिळवता येईल या दृष्टीनेच आम्ही तयारी सुरू केली आहे आणि मला खात्री आहे की या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचा खेळाडू पदकांच्या व्यासपीठावर उभा राहिलेला दिसेल,” असेही शिरगावकर यांनी सांगितले.
गोवा येथे चालू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत स्मिता शिरोळे महाराष्ट्राच्या पथकप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
यावेळी क्रीडा खात्याचे उपसचिव सुनील हांजे, ऑलंपिक संघटना खजिनदार धनंजय भोंसले, महाराष्ट्र पथक प्रमुख स्मिता शिरोळे, रणसिंग डेरे- कक्षाधिकारी- क्रीडा मंत्रालय व नवनाथ फडतरे आदी उपस्थित होते. राज्य सरकार व ऑलंपिक संघटना यांचे सयुक्तिक प्रयत्न फळाला आले.