– पुरुष हॉकी संघाच्या अभियानाला सोमवारपासून प्रारंभ; महिलांची पहिली लढत मंगळवारी
पणजी :- आंतरराष्ट्रीय हॉकीपटू युवराज वाल्मीकीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुरुष हॉकी संघ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत किताबाचा बहुमान मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे. मागील स्पर्धेत कांस्यपदक विजेत्या या संघाचे अभियान सोमवारपासून सुरू होणार आहे.
याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय हॉकीपटू अक्षदा ढेकलेचे कुशल कर्णधारपद लाभलेला महाराष्ट्र महिला हॉकी संघाला पदार्पणात सोनेरी यशाचा पल्ला गाठून देण्यासाठी उत्सुक आहे. तिच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र संघ प्रथमच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी झाला आहे. महाराष्ट्र महिला संघाची पहिली लढत मंगळवारी होणार आहे. महिला संघात गोलरक्षक काजल आटपाडीकर, निर्जला शिंदे व शालिनी साकुरे यांचाही समावेश आहे. काजलने भारतीय कनिष्ठ संघातून जर्मनी व आयर्लंड येथे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधित्व केले आहे.
महाराष्ट्र संघ किताबाचे प्रबळ दावेदार -अजित लाक्रा
महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष हॉकी संघाच्या खेळाडूंमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. यामुळे निश्चितपणे महाराष्ट्राचे दोन्ही संघ यंदा गोवा येथील राष्ट्रीय स्पर्धा दरम्यान सुवर्णपदकाचा बहुमान मिळवतील, असा विश्वास ऑलिम्पिक हॉकीपटू अजित लाक्रा यांनी व्यक्त केला आहे.
“महाराष्ट्राच्या दोन्ही संघांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा समावेश आहे. यामुळे महाराष्ट्राचे दोन्ही संघ स्पर्धेदरम्यान बलाढ्य मानले जात आहेत. या किताबासाठी संघांनी पुण्यातील बालेवाडीत कसून सराव केला आहे. त्यामुळे तंत्रशुद्ध प्रशिक्षणामुळे खेळाडूंच्या कामगिरीचा दर्जा उंचावलेला आहे. यातून संघ सोनेरी या संपादन करेल,” असे लाक्रा यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा अनुभव ठरणार महत्त्वाचा -सागर ठाकूर
महाराष्ट्र संघामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे या खेळाडूंच्या अनुभवाचा संघाला मोठा फायदा होणार आहे. याच पाठबळामुळे संघातील इतर युवा खेळाडूंच्याही कामगिरी मदत झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या संघ दोन्ही घटक सुवर्णपदकाच्या मानकरी ठरेल, असा निर्धार सागरसिंग ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.