– सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते १४८० कि.मी. लांबीच्या रस्ते कामांचे ई-भूमिपूजन
मुंबई :- आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित (एडीबी) महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प टप्पा-३ अंतर्गत राज्यातील २४ जिल्ह्यातील रु. १२ हजार ७६८ कोटी रूपये किंमतीच्या १४८० कि.मी. लांबीच्या दुपदरी सिमेंट काँक्रिट रस्त्यांचे भूमिपूजन एकाच वेळी त्या-त्या ठिकाणी पार पडले. मुख्य भूमिपूजन समारंभ दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पार पडला.
यावेळी विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा पाटणकर म्हैसकर, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षित, सचिव सदाशिव साळुंखे, सचिव संजय दशपुते, माजी आमदार प्रमोद जठार, मुख्य अभियंता राजभोज यांच्यसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे व महामंडळाचे अधिकारी मंत्रालयात उपस्थित होते.
राज्यातील रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी २०१८ मध्ये राज्य शासनाकडून ए.डी.बी. अर्थात आशियाई विकास बँकेकडून अर्थसहाय्य घेण्याचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला. आशियाई विकास बँक प्रकल्पाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण ९१९ कि.मी. लांबीच्या रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली. त्यापैकी ४५० कि.मी. लांबीचे रस्ते पूर्ण झाले असून उर्वरित ४६९ कि.मी. लांबीच्या रस्त्यांची कामे प्रगतीपथावर असून ७५ टक्के कामे पूर्ण झाली आहेत.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित (एडीबी) महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प टप्पा-३ अंतर्गत रु. १२ हजार ७६८ कोटी रूपये किंमतीच्या १४८० कि.मी. लांबीच्या दुपदरी सिमेंट काँक्रीट रस्त्यांची ४४ कामे राज्यात विविध ठिकाणी होणार असून यामध्ये एडीबीकडून ५०० दशलक्ष अमेरिकन डॉलर (रु.४१५० कोटी) इतके अर्थसहाय्य प्राप्त होणार आहे. उर्वरित रक्कम केंद्र शासन सहाय्य (Soft Loan) व राज्य शासनाच्या अर्थसंकल्पातून उपलब्ध होणार आहे.
एडीबीच्या माध्यमातून होणा-या कामांमध्ये जिल्हानिहाय कामे पुढीलप्रमाणे, लातूर-२, जालना व परभणी-२, हिंगोली -२, बुलढाणा -३, यवतमाळ -१, छत्रपती संभाजीनगर -३, बीड -२, धाराशिव -१, नंदुरबार -१, जळगाव -३, धुळे -२, अहमदनगर -४, सोलापूर -२, सिंधुदुर्ग -२, ठाणे -१, सातारा -१, कोल्हापूर -१, पुणे -४, पालघर -१, नाशिक -१, नागपूर -३, चंद्रपूर -१, वर्धा -२ अशी २४ जिल्ह्यातील एकूण ४४ मतदार संघातील कामे समाविष्ट आहेत. या कामांच्या जाहीर निविदा प्रक्रिया व ठेकेदार निश्चिती करण्यात आली असून लवकरच कामे सुरु होणार आहेत.
सदर रस्त्यांमुळे तेथील गावांमधील नागरिकांचा रोजचा प्रवास सुखकर होणार आहे. तसेच औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातील वाहतूक सोयीची होणार आहे. तसेच धार्मिक स्थळे व पर्यटन स्थळे चांगल्या दज्यांच्या रस्त्यांनी जोडली जाणार आहेत. त्यामुळे नवीन उद्योग निर्मिती होऊन स्थानिक नागरिकांसाठी रोजगार उपलब्ध होणार आहेत.
पर्यावरण संवर्धनासाठी रस्त्याच्या दुतर्फा अंदाजे ३ लाख झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच या प्रकल्पांतर्गत बंधाऱ्यावरील पूल बांधण्यात येणार आहेत व त्यामुळे लगतच्या भागाची पाण्याचो पातळी उंचावण्यास मदत होणार आहे. रस्त्याच्या भागातील शाळांमध्ये शालेय विद्यार्थीनींसाठी स्वच्छतागृहांचे बांधकाम करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी बस निवारे बांधण्यात येणार आहेत.भूजल पातळी वाढविण्यासाठी पाईप मोऱ्यांच्या ठिकाणी जल पुनर्भरण व्यवस्था उभारण्यात येणार आहे. प्रकल्प राबविताना सामाजिक सुरक्षा व पर्यावरण सांभाळले जाणार आहे.