मुंबई :- अमेरिकेत रोजगारासाठी आवश्यक असलेली कौशल्य विकसित करण्यासाठी, महाराष्ट्र इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय रोजगार सुविधा केंद्राला सहकार्य मिळण्याबाबत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी अमेरिकन शिष्टमंडळाशी आज चर्चा केली.
सह्याद्री अतिथीगृह येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या ‘महाराष्ट्र इंटरनॅशनल’ या आंतरराष्ट्रीय रोजगार सुविधा केंद्राबाबत अमेरिका आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने परदेशातील रोजगाराच्या संधीसाठी भविष्यातील सहकार्याबाबत चर्चा करण्यासाठी अमेरिकन शिष्टमंडळ उपस्थित होते.
मंत्री लोढा म्हणाले की, विभागाच्या माध्यमातून किमान 900 आयटीआय मध्ये 90 पेक्षा अधिक विविध अभ्यासक्रम (ट्रेड) शिकवले जातात. दरवर्षी दीड लाख युवकांना या माध्यमातून कौशल्य विकास केले जाते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने कुशल मनुष्यबळ निर्माण करणे ही काळाची गरज आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्किल, रिस्किल आणि अपस्किल या संकल्पनांना प्रोत्साहन दिलेले आहे. महाराष्ट्र इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय रोजगार सुविधा केंद्रामार्फत परदेशात नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या राज्यातील उमेदवारांची नोंदणी, माहिती संकलन तयार करणे, प्रशिक्षण देणे हे उपक्रम राबवण्यात येणार आहेत. अमेरिकेमध्ये विविध क्षेत्रात लागणारे कुशल मनुष्यबळ करण्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण आणि त्यासाठी लागणारे सहकार्य याची यावेळी चर्चा करण्यात आली.
यावेळी रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी, कौशल्य विकास विद्यापीठाच्या कुलगुरू अपूर्वा पालकर, राज्य नाविन्यता सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद शिंदे, अमेरिकेच्या विविध प्रांताचे प्रतिनिधी इलरीच, कंट्री कौन्सिलचे प्रतिनिधी इव्हन ग्लास, काउंटी कौन्सिलचे अध्यक्ष टॉम किन्स, सदस्य अमिताभ वर्षाने, अश शेट्टी, जुडी कॉस्टिल्यू, महेश कळवा, अंजू अग्रवाल, सागर सावंत, मोझेस हेन्री, डॅनियल निडकी, कौंबा ग्रवेस, पवन बेझवाडा यासह अमेरिकेच्या विविध प्रांतातील उद्योगपती, विविध कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अधिकारी, प्रतिनिधी तसेच महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी, वैद्यकीय आणि माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ यावेळी उपस्थित होते.