– बायोमासपासून औषध निर्माणासाठी संयुगांवर डॉ. अक्षय गुरव यांचा अभ्यास
– 10 आंतरराष्ट्रीय शोध प्रबंध प्रकाशित तर 3 पेटेंट आपल्या नावी करण्याचा गौरव
नागपूर :- बदलत्या जीवनशैलीमुळे आणि असंतुलित आहारामुळे अनेक आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यापैकी एक गंभीर आजार म्हणजे कर्करोग (कॅन्सर) होय. जगभरात जितक्या वेगाने प्रगती होत आहे त्याच वेगाने कॅन्सर आपले पाय पसरत आहे. कॅन्सर हा एक गंभीर आजार असून दरवर्षी या आजारामुळे जगात लाखो लोकांचा बळी जात आहे. कॅन्सर आजारावर औषध काढण्यासाठी अनेक वैज्ञानिक आणि संशोधक प्रयत्न करीत आहे. अशातच भारतामध्ये स्तनांचा कर्करोगाचे (ब्रेस्ट कॅन्सर) रुग्ण वाढत आहेत, जे या रोगाच्या वाढत्या प्रसाराचे चिंताजनक संकेत आहेत. ब्रेस्ट कॅन्सर या आजारावर यशस्वी निदान करण्याचे संशोधन महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) डॉ. अक्षय पांडुरंग गुरव यांनी केले. याशिवाय डॉ. गुरव यांनी 10 आंतरराष्ट्रीय रिसर्च पेपर पब्लिश केले आणि 3 पेटेंट पब्लिश करून उल्लेखनिय कामगिरी त्यांनी केली आहे.
बायोमास पासून निर्मित फुरफुरालस ह्या संयुगांचा वापर करून हायड्राझिनिल थायाझोल हे संयुग बनविण्यात यश मिळविले आहे. ही संयुगे ब्रेस्ट कॅन्सरवरील आधुनिक आणि प्रभावी उपचारांसाठी मोलाचे ठरणार आहे. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या अधिविभागातील सेंद्रिय रसायनशास्त्र संशोधक डॉ. अक्षय पांडुरंग गुरव यांनी त्यांचे संशोधक मार्गदर्शक डॉ. शंकर हांगिरगेकर यांच्या मदतीने बायोमासपासून औषध निर्माण क्षेत्रासाठी अत्यंत उपयुक्त असणाऱ्या संयुगांची निर्मिती करण्यात यश मिळविले आहे. संशोधकांनी ग्राइंडस्टोन केमिस्ट्री वापरून बायोमासपासून हायड्रॉक्झी मिथाईल फुरफुराल हे मूलद्रव्य वापरून नवीन हायड्राझिनिल थायाझोल संयुगे तयार करण्याची पद्धती शोधली आहे. या शोधाला जर्मन चे प्रतिष्ठित पेटंट मिळाले आहे.
डॉ. गुरव यांनी सांगितले की, या संशोधनात नवीन हायड्राझिनिल थायाझोल संयुगे तयार करण्यासाठी ग्राइंडस्टोन केमिस्ट्री या अत्यंत सोप्या आणि पर्यावरणपूरक पद्धतीचा वापर करण्यात आला. या नव्या पद्धतीमध्ये कोणत्याही उत्प्रेरकाचा किंवा द्रावणाचा वापर न करता कमी वेळेत उत्कृष्ट उत्पादन मिळवता आले. बायोमासपासून निर्मित फाईव्ह हायड्रॉक्सी मिथाइल फुरफुराल (एचएमएफ) याचा महत्त्वपूर्ण घटक म्हणून वापर करून औषध निर्माण क्षेत्रात उपयुक्त असलेल्या हायड्राझिनिल थायाझोल संयुगांचा संग्रहच तयार केला. हे संशोधन औषध निर्माण क्षेत्रासाठी अभिनव ठरले आहे. पर्यावरणपूरक रसायनशास्त्रातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या पद्धतीच्या वापरामुळे शाश्वत विकासाला चालना मिळेल तसेच हा शोध हरित संशोधनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरेल, असे मत डॉ. गुरव यांनी व्यक्त केले.
शाश्वत विकासाला चालना मिळेल
‘जै-नवीकरणीय स्त्रोतांपासून प्राप्त होणाऱ्या संयुगांमध्ये एचएमएफ हे महत्त्वाचे जैव-आधारित रासायनिक मध्यवर्ती असते. लिग्नोसेल्युलोसिक बायोमास आणि अन्न कचऱ्यापासून ते उपलब्ध होऊ शकते. पर्यावरणपूरक दृष्टिकोनातून, रासायनिक प्रक्रिया अधिक शाश्वत करण्यासाठी एचएमएफसारख्या बायोमास-आधारित संयुगांचा वापर करणे महत्त्वाचे ठरते. त्यापासून तयार केलेल्या हायड्राझिनिल थायाझोल संशोधन क्षेत्रात अँटी-बॅक्टेरियल, ऑक्सिडंट आणि कॅन्सर या चाचण्यांसाठी उपयोग झाला आहे. अन्न सुरक्षा आणि पर्यावरणीय शाश्वततेसाठी हे महत्त्वपूर्ण ठरू शकते’ असे प्रबंधात नमूद केले आहे. ‘महाज्योती’मुळे माझ्या संशोधनाला प्रेरणा ठरली आहे असे मनोगत डॉ. गुरव यांनी व्यक्त केले. माझ्या संशोधनामधुन नक्कीच सेंद्रिय रसायनशास्त्र संशोधनाला एक दिशा ठरणार. डॉ. गुरव यांनी ‘महाज्योती’चे प्र. व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांचे सहकार्यासह वडिल पांडुरंग गुरव यांनी दिलेल्या आशिर्वादाचे आभार मानले आहे. तसेच भविष्यात देखील ‘महाज्योती’संस्थेकडून मिळणाऱ्या फेलोशिपचा संशोधकांना फायदा होणार असा विश्वास डॉ. गुरव यांनी व्यक्त केले.
हरित संशोधनाच्या दिशेने क्रांतीकार पाऊल : प्रशांत वावगे
महाज्योती’मार्फत ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी प्रवर्गातील पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना विद्यावेतनातून त्यांना अर्थसहाय्याचे पाठबळ देण्याचे मोलाचे कार्य करीत आहे. त्यामुळेच आज काळाची गरज असलेल्या ब्रेस्ट कॅन्सर वर प्रभावी उपचारावर केलेल्या अभ्यासामुळेच डॉ. गुरव यांना शिवाजी विद्यापीठातून पी.एच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. डॉ. गुरव यांचा प्रबंध हरित संशोधन देशासह जगासाठी हरित संशोधनाच्या दिशेने क्रांतीकार पाऊल ठरणार अशी प्रतिक्रीया ‘महाज्योती’चे प्र. व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांनी दिली.
मंत्री अतुल सावेंनी केले डॉ. अक्षय गुरव यांचे कौतुक
महाज्योतीचे अध्यक्ष तथा इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी ब्रेस्ट कॅन्सर आजाराबाबत औषध निर्माणसाठी नवीन संयुगांवर प्रभावी संशोधन करणाऱ्या डॉ. अक्षय गुरव यांचे कौतूक केले. डॉ. गुरव यांचा प्रबंध राज्यासह संपूर्ण विश्वासाठी भविष्यात मोलाचे ठरणारा आहे अशी प्रतिक्रीया मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. तसेच पुढील वाटचालीसाठी डॉ. अक्षय गुरव यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.