सिमेंट, विटा सवलती दरात दिल्यास १०० टक्के फ्लाय ॲशचा वापर शक्य
राष्ट्रवादी काँग्रेसच्या भुषण चंद्रशेखर यांची मागणी
नागपूर :-औष्णिक ऊर्जानिर्मितीमुळे होणाऱ्या प्रदूषणाने शेतीचे नुकसान, पाण्यावर होणारा परिणाम, राख पसरून स्थानिकांच्या आरोग्याचा निर्माण झालेला प्रश्न असे अनेक पैलू आहेत. या पार्श्वभूमीवर १०० टक्के राखेचा वापर होण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भुषण चंद्रशेखर यांनी महानिर्मितीचे व्यवस्थापकीय अध्यक्ष व संचालक तसेच मुख्य अभियंता, कोराडी औष्णिक वीज केंद्र यांना महानिर्मितीने ‘सिमेंट व विटा’ निर्मिती प्रकल्प सुरू करून वीज केंद्राच्या माध्यमातून सवलतीच्या दरात जनतेला विक्रीकरीता उपलब्ध करून देण्यासाठी निवेदन दिले आहे.
१०० टक्के राखेचा वापर, शून्य टक्के प्रदूषण असा संकल्प पूर्ण करण्याच्या हेतूने ३x६६० कोराडी औष्णिक वीज निर्मिती केंद्र, खापरखेडा वीज केंद्र व महानिर्मितीचे राज्यातील इतर वीज निर्मिती केंद्रात वीज निर्मितीनंतर लाखो टन बाहेर पडणारी राख सिमेंट कंपन्यांना अगदी मोफत देण्यात येते. त्यातून त्या सिमेंट कंपन्या कोटी रुपये नफा कमवितात. दुसरीकडे महानिर्मिती कंपनीला शेकडो कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागते. महानिर्मितीने स्वतःचाच एक सिमेंट प्रकल्प, विटा निर्मिती प्रकल्प सुरू करावा. वीज केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना सवलतीच्या दरात सिमेंट, विटा उपलब्ध झाल्यास त्याची विक्री रेकॉर्ड स्तरावर होईल. यातून मिळणाऱ्या महसुलातून वीजनिर्मितीचा उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होईल. त्याचा फायदा साहजिकच प्रकल्पबाधित गावांसोबतच संपूर्ण राज्यातील सर्वच स्तरातील लोकांना होईल. महानिर्मिती दरवर्षी लाखो टन राखेची निर्मिती करते. ही राख सिमेंट कंपन्यां मोफत घेऊन जातात. सिमेंट मध्ये फ्लाय ॲशचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. महानिर्मितीला फ्लाय ॲश सिमेंट कंपन्यांपर्यंत पाठवण्यासाठी वाहतूकीचा ५० टक्के खर्चही करावा लागतो. महानिर्मितीने सिमेंट तयार करण्यासोबतच विटा व इतर साहित्य तयार करण्याचा प्रकल्प उभारणी केल्यास १०० टक्के राखेचा वापर होईल त्याचप्रमाणे मोठया प्रमाणावर रोजगाराच्या संधी बेरोजगारांना उपलब्ध होतील. असे चंद्रशेखर म्हणाले.
वीज प्रकल्पाच्या ३०० किलोमीटर अंतरापर्यंतच्या सिमेंट निर्मिती कंपन्यांना राख मोफत देणे आहे. या निर्णयामुळे वीजकंपनीच्या वाहतूक खर्चात तिप्पट वाढ झाली आहे. हा खर्च वीजनिर्मितीत जोडावा लागतो. त्याची भरपाई महावितरण ग्राहकांकडून वसूल करते. ही वस्तुस्थिती आहे.
महानिर्मिती औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राकडे मोठ्या प्रमाणात मोकळ्या जमीन उपलब्ध आहेत. आज सिमेंटच्या ५० किलो बॅगची किंमत ३८० ते ४०० रुपये, विटा ५ रुपये या दरात विक्री होत आहे. ही साहित्य महानिर्मितीने ५०% किंवा माफक दरात स्वतः तयार करून वीज केंद्रांमार्फत विक्री करीता उपलब्ध करून दिल्यास मोठ्या प्रमाणात महसूल व लाभ होईल. यातून महानिर्मितीला मोठ्या प्रमाणात नफा होऊ शकतो. असे भुषण चंद्रशेखर यांनी निवेदनातून सांगितले.
जनतेला औष्णिक वीज निर्मिती केंद्राकडून होणाऱ्या प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतो. सवलतीच्या दरात सिमेंट व विटा असे लोकोपयोगी साहित्य उपलब्ध झाल्यास सर्वच स्तरातून महानिर्मितीचे कौतुक व अभिनंदन होईल. यात शंका नाही, याबाबतीत सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास राखेचा सदुपयोग होईल. असे भुषण चंद्रशेखर यांनी सांगितले. निवेदनाची प्रत मुख्यमंत्री सचिवालय कक्ष नागपूर, प्र.प्रादेशिक अधिकारी नागपूर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना ही देण्यात आली.
“महाराष्ट्रात कोराडी,खापरखेडा,चंद्रपूर,भुसावळ, पारस, परळी, नाशिक या औष्णिक वीज केंद्रातून विविध कंपन्या हजारो मेट्रिक टन राखेची निशुल्क उचल करतात. त्याचा वापर करून मोठा नफा कमावतात. महानिर्मिती ने स्वतः सिमेंट, विटा निर्मिती कारखाने उभारल्यास मोठ्या प्रमाणात नफा होईल.”
– भुषण चंद्रशेखर जिल्हा उपाध्यक्ष, नागपूर(ग्रा),
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
“महानिर्मितीने स्वतः ची कारखाने उभारून सवलतीच्या दरात सिमेंट,विटा दिल्यास प्रदूषण ग्रस्तांना व सामान्यांना लाभ मिळेल तसेच काही प्रमाणात पर्यावरणाचे संरक्षण होईल.”
– उषा रघुनाथ शाहू अध्यक्ष, कामठी-मौदा विधानसभा,
राष्ट्रवादी महिला काँग्रेस