– लग्न करण्याचे स्वप्न भंगले, दोन्ही मुली सुरक्षित
– लग्न करायला निघाले, पोलिसांच्या जाळ्यात अडकले
नागपूर :-गोंदियाहून निघालेली लव्ह एक्सप्रेस नागपुरात रूळावरून घसरली अन् त्यांच्या स्वप्नाचा चुराडा झाला. सुसाट निघालेल्या लव्ह एक्सप्रेसला नागपुरात चाईल्ड लाईन प्रतिनिधीच्या रुपात लाल सिग्नल मिळाले. सतर्क होण्याआधीच प्रतिनिधीने त्यांची सखोल चौकशी केली आणि चौघेही पोलिसांच्या जाळ्यात अडकले. हा प्रकार रविवारी सकाळी नागपूर रेल्वे स्थानकावर घडला. मुलींच्या पालकांना सुचना देण्यात आली असून सोमवारी ते मुलींना घ्यायला येणार आहेत.
बालाघाट, मध्य प्रदेशातील दोन मुली आणि दोन मुले एकाच परिसरात राहतात. मुली अल्पवयीन तर मुले जवळपास 20 वर्षाचे. त्या दोघ्याही मैत्रिणी तर मुलेही मित्र. नजरेला नजर भिडत असल्याने त्यांच्यात आकर्षण वाढले काही दिवसातच त्यांची बोलचाल सुरू झाली आणि मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात व्हायला वेळ लागला नाही. ते नेहमीच चोरून भेटायचे. परंतु असे किती दिवस भेटणार शिवाय घरच्यांना आणि लोकांनाही माहित पडेल. त्यामुळे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
ठरल्या प्रमाणे शनिवारी दुपारच्या सुमारास चौघेही घरून निघाले. रात्री पर्यंत गोंदिया रेल्वे स्थानकावर आले. महाराष्ट्र एक्सप्रेसने आज सकाळी नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचले. त्यांना दुसर्या गाडीने चित्तोडला जायचे होते. त्यामुळे चौघेही प्लॅटफार्म क्रमांक दोनवर थांबले. दरम्यान चाईल्ड लाईनच्या प्रतिनिधीचे लक्ष त्यांच्याकडे गेले. अल्पवयीन असल्याने त्याला शंका आली. त्याने विचारपूस केली असता काही तरी गडबड असल्याचे जाणवले. त्याने लगेच चाईल्ड लाईनच्या कक्षात घेवून आला. विचारपूस केली असता लग्न करण्यासाठी निघाले असल्याचा खुलासा झाला.
लगेच लोहमार्ग पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांनी मुलींच्या घरच्यांशी संपर्क साधला. आमच्या मुली घरी सांगून गेल्या नाही, त्यामुळे पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार देण्यासाठी गेल्याचे पालकांनी सांगितले. तुमच्या मुली सुरक्षित असल्याचे पोलिसांनी त्यांना सांगितले. आता पालक निश्चित झाले असून सोमवारी मुलींना घेण्यासाठी येणार आहेत.