नागपूर : क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लोकसहभागाशिवाय पर्याय नाही. लोकसहभागातून क्षयरोग जिल्हा मुक्त करू या, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.
क्षयरोग विभागाच्या योजनांच्या आढाव्यासंदर्भातील बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात आयोजित करण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॅा. ममता सोनसरे, डॅा. हर्षा मेश्राम यांच्यासह समितीचे सदस्य व वैद्यकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.
क्षयरोगाची माहिती देण्यासाठी खाजगी रुग्णालयांनी दरमहा क्षयरुग्णांचा अहवाल सादर करावा. टाळाटाळ केल्यास संबंधित रुग्णालयाविरुद्ध गुन्हे दाखल करण्याच्या सूचना जिल्हाधिका-यांनी दिल्या. जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांनी एकतरी क्षय रुग्णाचे पालकत्व स्विकारावे. त्यामुळे रुग्णास औषधोपचारास मदत होईल. निश्चय मित्र म्हणून या मोहिमेत सामील होण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी क्षयरोग विभागाचा त्यांनी आढावा घेतला. प्रधानमंत्री क्षयमुक्त भारत योजनेचा लाभ क्षयरुग्णांना द्या. तालुकानिहाय क्षयरुग्णांची चेक लिस्ट तयार करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. अन्न व औषधी विभागाने मेडिकल स्टोअर्स मध्ये नियमित तपासणी करून क्षयरुग्णाबाबत रजिस्टर तपासावे. प्रधानमंत्री क्षयमुक्त भारत योजना, आशा सेविकांच्या योजना, खाजगी रुग्णालयांना क्षयरुग्ण नोंदीबाबत सहाय्य आदी विषयांची माहिती यावेळी देण्यात आली.