गोंदिया :- गोंदिया शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक, राज्यसभा सदस्य प्रफुल पटेल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात ‘स्पर्धेमुळे सक्षमता आणि सक्षमतेमुळे रोजगार निर्मिती’ या विषयवार विध्यार्थ्यासाठी मार्गदर्शक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ शारदा महाजन होत्या. मार्गदर्शक म्हणून जिल्हा सांख्यिकी अधिकारी रुपेश राऊत तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ अर्चना जैन, डॉ रविंद्र मोहतुरे, डॉ अंबादास बाकरे, डॉ भावेश जसानी उपस्थित होते. मनोहरभाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्राचार्या डॉ. शारदा महाजन म्हणाल्या, प्रफुल पटेल हे सेवाव्रती व्यक्तिमत्व आहेत. त्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा त्यांचा वाढदिवस साजरा करताना युवकांना आपले भविष्य घडविण्यासाठी मार्गदर्शन मिळावे या उद्दात हेतूने संस्थेचे सचिव राजेंद्र जैन, संचालन निखिल जैन यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. युवकांना मार्गदर्शन करताना जिल्हा सांख्यिकी अधिकारी रुपेश राऊत यांनी आपल्या भाषणाची सुरुवात आपण शिक्षण कशासाठी घेता, या पासून करून ध्येय निश्चितीने यशाची प्राप्ती होते, इथपर्यंत सविस्तर मार्गदर्शन केले. पदवी असली म्हणजे नोकरी मिळत नाहीत तर नोकरी मिळवायची असेल तर स्पर्धा परीक्षेची माहिती असायला हवी आणि त्याची सुरुवात अगदी कमी वयापासून केली पाहिजे. पदवी मिळेपर्यंत कमीत कमी १०० स्पर्धा परीक्षेचा अनुभव असला पाहिजे. परंतु आपण वेळ वाया घालवितो. त्यामुळे आपण स्पर्धेत टिकत नाहीत. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचा अभाव हि आपली समस्या आहे. माहिती अभावी उच्च शिक्षित विधार्थी खालच्या स्तराच्या पदांची तयारी करतो. ७ वी पास विध्यार्थी स्पर्धा परीक्षा देऊ शकतो, हे आपल्या विध्यार्थ्यांना माहिती नसते. सातवी उत्तीर्ण विध्यार्थ्यांसाठी ५० ते ६०, दहावी उत्तीर्णसाठी १०० ते १५०, बारावी उत्तीर्णसाठी २०० ते ३०० आणि पदवी उत्तीर्णासाठी ९० टक्के नोकऱ्या आहेत. परीक्षेची तयारी लवकर केली तर यश लवकर मिळते. ध्येय प्राप्तीसाठी वेडे व्हावे लागते. त्यामुळे हाती असलेला वेळ वाया ना घालविता नियोजन करून परीक्षेच्या तयारीला लागा, नक्की यश मिळेल, असे राऊत यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन टीशा आहुजा व मीनल पिहरे, पाहुण्यांचा परिचय डॉ. अंबादास बाकरे तर आभार डॉ. योगराज बैस यांनी मानले. कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयीन प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.