– रोडमार्क फाउंडेशनच्या वतीने प्रथमोपचार प्रशिक्षण अभियान
नागपूर :– शहरात एकही अपघात होणार नाही आणि अपघात झालाच तर कुणाचे प्राण जाणार नाही, यासाठी तत्पर राहण्याची गरज आहे. शंभर टक्के अपघात कमी करणे कठीण आहे मात्र अशक्य मुळीच नाही. यासाठी शाळा-महाविद्यालये, समाजसेवी संस्था यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांनी प्रदूषणुक्त नागपूरसोबतच ‘अपघातमुक्त नागपूर’चा संकल्प सोडावा, असे आवाहन अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या कार्यकर्त्यांना केले.
रोडमार्ड फाउंडेशनच्या वतीने आयोजित प्रथमोपचार प्रशिक्षण अभियानाचा ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते शुभारंभ झाला. रेशीमबाग येथील कवीवर्य सुरेश भट सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्रीमंत मुधोजी राजे भोसले, वाहतुक पोलीस उपायुक्त चेतना तिडके, आयएमए नागपूरच्या अध्यक्ष डॉ. वंदना काटे, सीए राजेश लोया, रोडमार्क फाउंडेशनचे प्रमुख राजू वाघ आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. ना. गडकरी म्हणाले, ‘अपघातांमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे. दरवर्षी तरुण मुलांचे अपघातात मृत्यू झाल्यामुळे अनेक कुटुंबांनी आधार गमावला आहे. अशी वेळ कुणावरही येऊ नये, यासाठी अपघात रोखण्यावर भर दिला पाहिजे. राजू वाघ आणि चंद्रशेखर मोहिते ही मंडळी अत्यंत प्रामाणिकपणे काम करीत आहेत. त्यांच्यासारखे असंख्य कार्यकर्ते तयार झाले तर अपघातमुक्त नागपूरचे स्वप्न दूर नाही.’ रोड इंजिनिअरींग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, एज्युकेशन, एन्फोर्समेंट आणि इमर्जन्सी ही पंचसूत्री समजून घेतली तर अपघात रोखणे शक्य होईल, असेही ना. गडकरी म्हणाले. यावेळी राजू वाघ यांच्या रोडमार्क फाउंडेशनला पाच लाख रुपयांची मदत ना. गडकरी यांनी जाहीर केली. अपघात झाल्यास प्रथमोपचार कसा द्यावा, याचे प्रात्यक्षिक यावेळी दाखविण्यात आले. जनजागृती करणारे पथनाट्यही सादर करण्यात आले.
तर ‘त्या’ आंदोलनाला माझा पाठिंबा
नागपूर शहरात कोणत्या चौकांमध्ये आणि कोणत्या रस्त्यांवर सर्वाधिक अपघात होतात याची माहिती काढा. तो रस्ता महानगरपालिका, एमएसआरडीसी, एनएचएआय यांच्यापैकी कुणाच्या अख्त्यारित आहे, हे समजून घ्या आणि संबंधित कार्यालयाला नोटीस द्या. तरीही त्यांनी काहीच कार्यवाही केली नाही तर त्यांच्या कार्यालयापुढे आंदोलन करा. या आंदोलनाला माझा पाठिंबा असेल, असा विश्वास ना. नितीन गडकरी यांनी दिला.