ऑस्ट्रेलिया भारताशी शिक्षण, कौशल्य विकास,पर्यटन सहकार्य वाढविण्याबाबत उत्सुक – पॉल मर्फी

मुंबई :- ऑस्ट्रेलिया भारताचा अतिशय विश्वसनीय भागीदार असून आगामी काळात व्यापाराशिवाय उच्च शिक्षण, कौशल्य विकास, चित्रपट सहनिर्मिती, कला व संस्कृती तसेच पर्यटन वाढविण्याबद्दल कसोशीने प्रयत्न करणार असल्याची माहिती ऑस्ट्रेलियाचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत पॉल मर्फी यांनी आज येथे दिली.

पॉल मर्फी यांनी गुरुवारी (दि. २१) राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.

ऑस्ट्रेलियात जवळपास १० लाख भारतीय लोक राहत असून ते तेथील अर्थकारण, समाजकारण, क्रिकेट तसेच सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देत असल्याची माहिती पॉल मर्फी यांनी दिली.

भारतीय विद्यापीठांसोबत पदवी अभ्यासक्रमात सहकार्य, विद्यार्थी आदानप्रदान, परस्पर देशांमधील पदव्यांना मान्यता, ‘कमवा, शिका आणि पर्यटन करा’ आदी योजनांबद्दल विचार विनिमय सुरु असल्याची माहिती त्यांनी यावेळी राज्यपालांना दिली.

पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी ब्रिस्बेन व पर्थ ही शहरे देखील मुंबईशी थेट विमानसेवा सुरु करण्याबाबत विचार करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

क्रिकेट उभय देशांना जोडणारा दुवा: राज्यपाल

क्रिकेट हा भारत व ऑस्ट्रेलियाला जोडणारा सशक्त दुवा असून मर्फी यांच्या न्यू साऊथ वेल्स राज्याने क्रिकेट विश्वाला डॉन ब्रॅडमन, अॅलन बॉर्डर, मार्क टेलर, स्टीव्ह वॉ यांसारखे महान खेळाडू दिले आहेत असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. भारतातील तीन लाखांच्यावर पर्यटकांनी गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाला भेट दिल्याचे सांगून आपल्या कार्यकाळात उभय देशांमधील पर्यटन वाढविण्यासाठी प्रयत्न करावे असे राज्यपालांनी सांगितले.

नव्या शैक्षणिक धोरणात उच्च शिक्षण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यात येत असून ऑस्ट्रेलियाने भारतीय विद्यापीठांशी सहकार्य वाढवावे अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

बैठकीला ऑस्ट्रेलियाचे मुंबईतील उपवाणिज्य दूत क्रिश्चन जॅक व आर्थिक राजनीतिक अधिकारी गरिमा शेवकानी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात 'महिलांचे आरोग्य' या विषयावर डॉ. आरती रोजेकर यांची मुलाखत

Fri Mar 22 , 2024
मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘महिलांचे आरोग्य’ या विषयावर हिंदुजा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. आरती रोजेकर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. महिलांनी सर्वच क्षेत्रात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. महिलांचे आरोग्य चांगले राहिले तर त्याचा परिणाम निश्चितपणे देशाच्या सर्वांगीण विकासासाठी होणार आहे. दैनंदिन जीवनात महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, आहार कसा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com