– जागतिक क्षयरोग दिनापर्यंत चालणार मोहिम
नागपूर :- राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत नागपूर महानगरपालिकेतर्फे १०० दिवसीय क्षयरोग शोध मोहिम राबविण्यात येणार आहे. ही मोहिम ७ डिसेंबर २०२४ ते २४ मार्च २०२५ (जागतिक क्षयरोग दिन) पर्यंत राबविण्यात येणार आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनामध्ये वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या नेतृत्वात क्षयरोग शोध मोहिमेला सुरूवात झाली. शहर क्षेत्रातील जास्तीत जास्त क्षयरुग्ण शोधून त्यांना उपचारावर आणणे, क्षय रुग्णांचा मृत्यूदर कमी करणे, नवीन क्षयरुग्णांचे प्रमाण कमी करणे, वंचित व अतिजोखमीच्या घटकापर्यंत पोहोचून आरोग्य सेवा पुरविणे, क्षयरोग विषयी जनजागृती करणे, समाजामधील क्षयरोग विषयी जनजागृती करणे व सामाजिक कलंक कमी करण्यासाठी उपक्रम राबविणे, म.न.पा.तील संमती दिलेल्या क्षयरुग्णांना पंतप्रधान क्षय मुक्त भारत अभियानाअंतर्गत निक्षय मित्र यांचेकडून पोषण आहार किटचे वाटप करणे, हा या मोहीमेचा उद्देश आहे.
१०० दिवसीय क्षयरोग मोहिम देशभरातील निवडलेल्या ३४७ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. यामध्ये नागपूर म.न.पा.चा समावेश आहे. १०० दिवसिय क्षयरोग शोध मोहीमेमध्ये सर्व म.न.पा.चे दवाखाने, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र याअंतर्गत येणारे जोखीमग्रस्त भागामध्ये सर्वेक्षण व क्षयरोगविषयक जनजागृती करण्यात येणार आहे. निक्षय शिबीर, अनाथाश्रम, वृध्दाश्रम, उद्योग संस्था, निवासी शाळा, कारागृह, येथे क्षयरोग तपासणी शिबिर व स्थलांतरीत, उच्च जोखीमग्रस्त भाग व वंचित घटक यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी मनपा स्तरावर नियोजन करण्यात आले आहे. सदर मोहिम राबविण्याकरिता लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते व इतर विभाग यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे.
राज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये सदर मोहिम राबविण्यात येणार असून त्यामध्ये नागपूर म.न.पा.ची निवड झाली आहे. सदर मोहीम ही Intensified case finding (ICF) प्रकारची मोहीम असल्यामुळे केवळ अति जोखमीच्या व्यक्तीमध्येच राबविण्यात येणार आहे.
मोहिमेचा उद्देश
१. अति जोखमीच्या गटातील व्यक्तीमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती राबवून क्षयरोग रुग्ण शोधणे.
२. क्षय रुग्णांमध्ये मृत्युचे प्रमाण कमी करणे.
३. टीपीटी चा प्रभावी वापर करुन नवीन क्षय रुग्णाचे प्रमाण कमी करणे.
४. जास्तीत जास्त क्षयरोग रुग्ण शोधून त्यांना उपचारावर आणणे.
५. नवीन क्षयरुग्णांचे प्रमाण कमी करणे
६. वंचित व अति जोखमीच्या घटकापर्यंत पोहोचून आरोग्य सेवा पुरविणे.
७. समाजामधील क्षयरोग विषयी जनजागृती करणे व सामाजिक कलंक कमी करण्यासाठी उपक्रम राबविणे.
८. जिल्ह्यातील संमती दिलेल्या क्षयरुग्णांना पंतप्रधान क्षय मुक्त भारत अभियानांतर्गत निक्षयमित्र यांचेकडून पोषण आहार किटचे वाटप करणे.
अति जोखमिचे गट पुढील प्रमाणे
१. साठ वर्षावरील व्यक्ती
२. मधुमेह असणाऱ्या व्यक्ती
३. धुम्रपान करणाऱ्या व्यक्ती
४. यापूर्वी क्षयरोगाचा उपचार घेतलेल्या व्यक्ती
५. क्षयरुग्णाच्या संपर्कातील घरातल्या व्यक्ती.
६. एच.आय.व्ही बाधित व्यक्ती
७. तुरुंगातील कैदी
८. निवासी शाळा
९. औद्योगिक वसाहती/कारखाने
१०. वृद्धाश्रम
११. बीएमआय १८ पेक्षा कमी असणाऱ्या व्यक्ती
१२ झोपडपट्टी
१३. अनाथ आश्रम
१४. औद्योगिक वसाहत मधील कामगार इत्यादी.