अमृत महोत्सवीय महाअभियान : लसीकरणासाठी पुढे येण्याचे आयुक्तांचे आवाहन
नागपूर :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या बुस्टर डोससाठी राबविण्यात येत असलेल्या महाअभियानासाठी शेवटचे फक्त १० दिवस शिल्लक आहेत. कोरोनाच्या संभाव्य धोक्यापासून सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण शहरात बुस्टर डोसच्या लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक पात्र व्यक्तीने आपले लसीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.
नागपूर महानगरपालिकेतर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार मनपा क्षेत्रात १८ वर्षावरील सर्वांच्या कोव्हिड प्रतिबंधात्मक बुस्टर डोस दिले जात आहे. नागरिकांनी लवकरात लवकर नि:शुल्क लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने ७५ दिवस नि:शुल्क बुस्टर डोसचे महाअभियान मनपाच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात आले होते. हे अभियान३० सप्टेंबरपर्यंत चालणार असून मनपा आणि शासकीय रुग्णालयाच्या केंद्रांवर नि:शुल्क बुस्टर डोस उपलब्ध आहे. यासोबतच सर्व केंद्रांवर १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी कॉर्बेव्हॅक्स लस सुद्धा उपलब्ध आहे.
कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन यापैकी कोणत्याही लसीचे दोन्ही डोस घेऊन ६ महिन्याचा कालावधी पूर्ण झालेल्या १८ वर्षावरील वयोगटातील नागरिकांना बुस्टर डोस घेता येणार आहे. यासाठी शहरात प्रत्येक झोनमध्ये विविध ठिकाणी लसीकरण केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता प्रत्येक पात्र व्यक्तीचे लसीकरण आवश्यक आहे. स्वत:च्या आरोग्यासह इतरांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही लसीकरण महत्वाचे आहे. त्यामुळे लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्या आणि दुसऱ्या डोसपासून सहा महिने पूर्ण झालेल्या प्रत्येक पात्र व्यक्तीने लसीकरणासाठी पुढे यावे, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.
आतापर्यंत नागपूर शहरातील एकूण ३८१७११ नागरिकांनी कोव्हिड प्रतिबंधात्मक बुस्टर डोस घेतला आहे. आरोग्य विभागातर्फे एकूण ४३,५४१०५ कोव्हिड प्रतिबंधात्मक मात्रा देण्यात आलेल्या असून यामध्ये पहिला डोस घेणारे २१९२६८८ तसेच दुसरा डोस घेणारे १७७९७०६ नागरिकांचा समावेश आहे. विभागाने आपले निर्धारित लक्ष प्राप्त केले असून उर्वरित नागरिकांनी सुद्धा बुस्टर डोस घेऊन स्वत:ला सुरक्षित ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण कमी झालेले असले तरी धोका मात्र टळलेला नाही. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सर्व पात्र व्यक्तींचे लसीकरण पूर्ण करून ज्यांचे लसीकरण पूर्ण झाले त्यांना बुस्टर डोस देण्याचा महत्वाचा निर्णय केंद्र सरकारद्वारे घेण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने नागपूर शहरातील बुस्टर डोससाठी पात्र प्रत्येक व्यक्तीच्या लसीकरणासाठी मनपाद्वारे विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.