मुंबई – औरंगाबाद जिल्ह्यातील मौजे मावसाळा (ता. खुलताबाद) येथील सेंट्रल इस्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट या संस्थेच्या ताब्यातील ४५ हेक्टर जमीन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नावे करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
मौजे मावसाळा (ता.खुलताबाद) येथील गट नं.1/10 मधील 45 हेक्टर शासकीय जमीन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सेंट्रल इस्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट, पुणे यांच्याकडून ताब्यात घेतलेली आहे. ही जमीन महामंडळाच्या नावे करण्यास मान्यता देण्यात आली. या ठिकाणी महामंडळाच्या वाहन चालकांना प्रशिक्षण देणे, अन्य ट्रक व बस ड्रायव्हर यांचे प्रशिक्षण वर्ग चालविणे आणि सुरक्षेबाबत अन्य प्रशिक्षण व संशोधनाच्या सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम 40 तसेच महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनींची विल्हेवाट लावणे) नियम 1971 मधील नियम 5 मधील तरतुदींनुसार अटी व शर्तींच्या अधिन राहून ही जमीन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नावे करण्यास मान्यता देण्यात आली.