– कृ.उ.बा.स. रामटेक ची १६ मे ला निवड प्रक्रिया संपन्न
रामटेक :- रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक नुकतीच पार पडली. दरम्यान दि.१६ में रोजी सभापती, उपसभापती पदासाठी निवड प्रक्रिया राबविण्यात आली. झालेल्या या निवडणूकीत सचिन किरपान यांची सभापती पदी तर उपसभापती पदी लक्ष्मी रविंद्र कुमरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संपन्न झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सचिन किरपान,मिन्नु उर्फ अनिल गुप्ता यांनी केदार गटाचे असतांनाही वेगळी निवडणूक लढविली होती. केदार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सोडुन आ.आशिष जैस्वाल यांच्या सोबत युती केली. पण त्यांना जनतेने नाकारले. एकही जागा त्यांची निवडून आली नाही. सचिन किरपान यांच्या आघाडीला १४ जागा मिळाल्या होत्या. तर माजी आमदार डी.एम रेड्डी, उदयसिंह यादव, हरिष उईके जि.प.सदस्य, व प्रहारचे रमेश कारेमोरे यांच्या आघाडीला ४ जागा मिळाल्या होत्या. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूकीत दगा फटका होऊ नये म्हणून सचिन किरपान गटाचे सर्व संचालक तीर्थयात्रेला गेले होते.ते निवडणूकीच्या दिवशीच हजर झालेत.शेवटी निवडणूक ही बिनविरोध झाली.
या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे १९७३ ला बाजार समितीच्या स्थापनेपासून प्रथमच एक आदिवासी महिला उपसभापती पदी विराजमान झाली आहे . निवडणूकीत अध्यासी अधिकारी म्हणून सावनेरचे सहाय्यक निबंधक राजेंद्र वाघे यांनी कार्य पार पाडले तर समितीचे सचिव हनुमंता महाजन यांनी त्यांना सहकार्य केले.