– मोतीबाग परीसरातील मध्यरात्रीचा थरार
– अनेक वार करून रक्ताच्या थारोळयात लोळविले
नागपूर :- केवळ धक्का लागला म्हणून संतापलेल्या अल्पवयीन मुलाने तलवारीने अनेक वार करून प्लॅस्टिक वेचणार्या इसमाची हत्या केली. मध्यरात्रीचा थरार जरीपटका पोलिस ठाण्याअंतर्गत मोतीबागेत घडला. शेखर (40) असे मृतकाचे नाव आहे. त्याची ओळख अजूनही पटली नाही. पोलिसांनी अल्पवयीन मुलास ताब्यात घेवून ठाण्यात आणले. चौकशी करून कायदेशिर प्रक्रियेनंतर त्याला बाल सुधारगृहात पाठविण्यात आले.
मृतक शेखर हा भंगार वेचून त्याची विक्री करतो. मिळालेल्या पैशावर त्याची उपजिवीका सुरू होती. अल्पवयीन बालक, मोतीबाग येथील पहेलवान बाब दर्गाजवळ राहतो. त्याला आई, एक भाउ आणि बहिण आहे. मध्यरात्री शेखर त्याच्या घराजवळून जात होता. केवळ धक्का लागला म्हणून त्यांच्यात वाद झाला. वाद विकोपाला जाताच अल्पवयीन मुलाने घरात ठेवलेली तलवार आणली. शेखरला काही कळण्याआधीच त्याच्यावर अनेक वार केले. शेखर आपला जीव वाचविण्यासाठी पळाला मात्र, अल्पवयीन मुलाने त्याचा पाठलाग करून रक्तबंबाळ केले. शेखर खाली कोसळला. मोठ्या प्रमाणावर रक्त वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान जरीपटका पोलिस पेट्रोलिंगवर होते. मोतीबाग परिसरात असताना पोलिसांचे वाहन पाहून अल्पवयीन मुलगा पळाला. पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी एका महिलेची विचारपूस केली. तो माझाच मुलगा आहे, त्याने एका व्यक्तीचा खून केला आहे. त्यामुळे पोलिसांना पाहून तो पळाला. अशा माहितीच्या आधारे पोलिसांनी अल्पवयीन मुलाचा शोध घेतला. त्याला ताब्यात घेवून पोलिस ठाण्यात आणले. कायदेशिर प्रक्रियेनंतर त्याला बाल सुधार गृहात पाठविण्यात येणार आहे. या प्रकरणी पोलिस हवालदार मुकेश हलमारे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनाची तक्रार नोंदविली. या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक प्रदीप काइट, विद्या काळे, सचिन बडोले यांनी केली.