मुंबई :- लातूर व धाराशिव जिल्ह्यातील भूकंप बाधित गावांसाठी ‘किल्लारी भूकंप पुनर्वसन व पुनर्बांधणी कार्यक्रम’ राबविण्यात येणार आहे. या बाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.
किल्लारी भूकंपाला 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. बाधित गावांचे वर्गीकरण करून अ वर्ग व ब वर्ग गावातील 37 गावाना नागरी सुविधा देण्यात आल्या. क वर्गातील काही गावांमध्ये नागरी सुविधांची काही कामे प्रलंबित आहेत त्यामुळे ज्या भागांमध्ये अद्यापही आवश्यक नागरी सुविधा पोहोचल्या नाहीत त्या भूकंप बाधित गावात सद्यस्थितीत भूकंपग्रस्त गावांमधील पायाभूत सुविधांची कामे करण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या मागणीचा सकारात्मक विचार करून किल्लारी भूकंप पुनर्वसन व पुनर्बांधणी कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे.
औसा तालुक्यातील भूकंपग्रस्त भाग पुनर्विकास आराखडा तयार करण्यासाठी पंचायत समिती स्तरावर समिती स्थापन करण्यात आली आहे. हा अहवाल जिल्हा आपत्ती प्राधिकरणामार्फत प्राप्त झाल्यानंतर त्यावर योग्य ती कार्यवाही केली जाईल, असेही मदत व पुनर्वसन मंत्री जाधव-पाटील यांनी सांगितले.
या संदर्भात सदस्य अभिमन्यू पवार यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती.