विद्यापीठातील प्रादर्शिक कला विभागात कथ्थक कार्यशाळेचे थाटात उद्घाटन
अमरावती – कोणत्याही कामात सातत्य असले पाहिजे. यश मिळवायचे असेल तर त्यासाठी खडतर प्रवासही करावा लागतो. कथ्थक नृत्याचा प्रवासही तसा खडतरच आहे, पण त्यासाठी दिर्घकाळ सराव करावा लागतो. एकाएकी यश मिळवणे तितके सोपे नसले, तरी सातत्य ठेवले, तरी यश निश्चितच मिळेल, असे प्रतिपादन प्रसिध्द हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिध्द अभिनेत्री व कथ्थक नृत्यांगणा शर्वरी जमेनिस यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील प्रादर्शिक कला विभागाच्यावतीने दिनांक 25 व 26 फेब्राुवारी रोजी ‘नृत्य शैलीतील खलनायकावर आधारीत गतभाव’ या विषयावर दोन दिवसीय कथ्थक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर, प्रमुख अतिथी व कार्यशाळेच्या प्रशिक्षक अभिनेत्री शर्वरी जमेनिस, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, प्रादर्शिक कला विभागाचे समन्वयक रमेश जाधव, हेमंत नृत्य कला मंदीर, अमरावतीचे मोहन बोडे, चला हवा येऊ द्या फेम अभिनेते अंकुर वाडवे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सर्वप्रथम दीपप्रज्वलन व नटराज यांच्या मूर्तिचे पूजन करुन कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला.
अभिनेत्री शर्वरी जमेनिस पुढे म्हणाल्या, येथे आल्यावर येथील कला अभ्यास विषयक सोयीसुविधा पाहून आणि भव्य रंगमंच पाहिल्यावर अगदी भारावून गेले. पुणे येथील विद्यापीठात शिक्षण घेत असतांना आम्हाला अशा प्रकारची मागणी करावी लागली होती. मात्र येथे कला विषयी असलेल्या सोयीसुविधांचा विद्याथ्र्यांनी उपयोग घ्यावा, आपल्यातील कलागुण जगासमोर आणून मोत्याप्रमाणे आपले नाव उंचवावे असे सांगून त्यांनी उपस्थित विद्याथ्र्यांना शुभेच्छा दिल्या. त्या पुढे म्हणाल्या की, महाराष्ट्रात लोककला आहे, पण स्वतःची अशी शास्त्रीय कला नाही. त्यामुळे शास्त्रीय कलाकारांना येथे प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे त्यांना आता शिकता येईल. चित्रपटसृष्टीची जेव्हा ऑफर आली, तेव्हा माझ्या गुरुंनाही आपली शिष्या आपल्याला सोडून जाते असेच वाटले होते. परंतु त्यांच्या डोळ्यातील भाव लक्षात आले आणि ठरवले की, आपल्या कलेशी कधीच तडजोड करणार नाही.
अभिनय क्षेत्रात खूप पैसा, प्रसिध्दी आहे, परंतु मला समाधान हवे होते व त्यासाठी मी नृत्याशी तडजोड केली नाही. विद्याथ्र्यांना उद्देशून त्या म्हणाल्या, कथ्थक नृत्याचा प्रवास खडतर आहे. ही कला अंगी बिंबवायलाच किमान पाच वर्षे जातील. मात्र म्हणून निराश होऊ नका. कला आपल्या जीवनाच्या अखेरपर्यंत राहते. यश मिळायला वेळ लागतो, त्यासाठी सातत्य ठेवा, यश निश्चितच मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी उपस्थित विद्याथ्र्यांना दिला.
कुलसचिव डॉ. तुषार देशमुख म्हणाले, दीड वर्षापूर्वी प्रादर्शिक कला विभाग सुरु झाला. परंतु या विभागाने चांगली प्रगती साधली आहे. प्रत्येकामध्ये एक कलाकार दडलेला असतो. कलावंत सदैव सजीव असतात, ज्या दृष्टीकोनातून आपण पहाल, तेच आपल्याला दिसेल. अध्यक्षीय भाषणातून प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर यांनीही प्रादर्शिक कला विभागाच्या कार्यक्रमाचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी दूरचित्रवाहिनीवरील प्रसिध्द मालिका चला हवा येऊ द्या मधील कलावंत अंकुर वाडवे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. आपण शिकत असलेली कला आपल्या डोक्यात ठेवा, परंतु जेव्हा आपल्याला प्रत्यक्ष कुठे काम करावयाचे असेल तर, तेथे त्या कामाची आपली तयारी ठेवावी, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. हेमंत नृत्य कला मंदीराचे डॉ. मोहन यांनी प्रमुख अतिथी अभिनेत्री शर्वरी जमेनिस यांचा परिचय करुन दिला. प्रास्ताविकातून विभागाचे समन्वयक आर.एम. जाधव यांनी कार्यशाळेमागील भूमिका सांगितली. संचालन प्रा सुवर्णा गाडगे यांनी, तर आभार डॉ. मोहन बोडे यांनी मानले.
अभिनेत्री शर्वरी जमेनिस हिने दिले कथ्थकचे धडे
कार्यशाळेत सहभागी कलावंत विद्याथ्र्यांना अभिनेत्री शर्वरी जमेनिस हिने कथ्थक कला प्रकारात प्रशिक्षण दिले. यावेळी सहभागी विद्याथ्र्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. विदर्भातील कलावंतांमध्ये खूप क्षमता आहे, पण त्यांना संधी मिळण्याची गरज होती. या कार्यशाळेच्या माध्यमातून त्यांना संधी मिळाल्यामुळे भविष्यात ते आपल्या कलेचे सादरीकरण उत्कृष्टपणे करू शकतील असा विश्वास तिने व्यक्त केला