– मान्यवरांच्या हस्ते मनपाचे स्वच्छतादूत अन् स्वयंसेवी संस्थांचा सत्कार
– पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सहकार्याबद्दल नागरिकांच्या कार्याची प्रशंसा
नागपूर :- नागपूर शहराला स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी सर्वानी एकत्रित येण्याची गरज आहे. नागरिकांनी स्वतःच्या घरा प्रमाणे शहराला ही स्वच्छ आणि सुंदर ठेवायला हवे. त्याकरिता “संपूर्ण शहर हे माझे घर” असल्याचा विचार मनात बाळगायला हवा. असे आवाहन नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.
स्वच्छ भारत अभियानच्या स्वच्छता पंधरवडा अंतर्गत “स्वच्छता ही सेवा 2023” हा उपक्रम १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान शहरात राबविण्यात आला. स्वच्छता मोहिमेचा एक भाग म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त (ता 2) महाल येथील मनपाच्या राजे रघुजी भोसले नगर भवन (टाऊन हॉल) येथे सफाई कामगारांचा सत्कार व गणेशोत्सवात सहकार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्याहस्ते शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मनपाचे उपायुक्त रवींद्र भेलावे, निर्भय जैन, घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, सहायक आयुक्त गणेश राठोड, स्वच्छ भारत अभियान नागपूरचे ब्रँड अॅम्बेसेडर कौस्तभ चॅटर्जी, किरण मुंदडा, उमेश चित्रीव यांच्यासह मनपाचे अधिकारी, सफाई कर्मचारी व स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमात सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित त्यांच्या तैलचित्रावर पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
मार्गदर्शन करतांना मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले की, नागपूर शहराला स्वच्छ आणि सुंदर शहरांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचविण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्वाचा आहे. स्वच्छता कर्मचारी आणि नागरिक मिळून स्वच्छतेच्या दृष्टीने उत्तम कार्य करू शकतात याची प्रचीती आपल्याला नुकत्याच उद्भवलेल्या पूरजन्य परिस्थितीत आली मनपाच्या कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या सहकार्याने कार्य करीत जनजीवन पूर्ववत आणले. याशिवाय पर्यावरणपूरक गणेशोत्सव या संकल्पनेला साकार करण्याकरिता देखील नागरिकांनी उत्तम सहकार्य केले. पर्यावरणपूरक गणेशोत्सवा संदर्भात मनपाद्वारे विविध उपक्रम राबविल्या आले. या उपक्रमांना देखील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परिणामी आपण नैसर्गिक पाण्याच्या साठ्यांना प्रदूषणापासून दूर ठेवता आले असल्याचेही डॉ. चौधरी यांनी सांगितले.
कार्यक्रमात माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी सर्वप्रथम पर्यावरणपूरक गणेशोत्सव संकल्पनेला परिपूर्णतः कडे घेऊन जाण्यासाठी नागरिकांचे आभार मानले. तसेच नागरिकांनी एकत्रित येऊन नागपूर शहराला स्वच्छ सुंदर साकारण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी तर सूत्रसंचालन व आभार जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी व्यक्त केले. यावेळी स्वच्छ भारत मिशन नागपूरचे अनीत कोल्हे, प्रिया राहंगडाले, कार्यकारी अभियंता रक्षमवार यांच्यासह कर्मचारी प्रमुख्याने उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते मनपाच्या स्वच्छतादूत यांचा सत्कार
कार्यक्रमात मनपाच्या दहाही झोनच्या सफाई कामगार यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते संदेश गोपीचंद अंबादे, मदन महेश ठाकुर, सुरेश मोरेश्वर ठाकरे, प्रदीप श्रीराम ठवरे, जितू गणेश रक्सेल, हर्षवर्धन पांडुरंग रामटेके, एकनाथ भगवान जांभूळकर, राहुल कैथेल, राजु रामनाथ गौरे, विजय श्रीरंग वानखेडे यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
याशिवाय इंडिअन स्वच्छता लीगच्या दुसऱ्या पर्वात मनपाच्या नागपूर टायगर्स संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या सुरभी जैस्वाल हिचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
स्वयंसेवी संस्थांचा सन्मान
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासह इतर उपक्रमात विशेष सहकार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यात ग्रीन व्हिजिल फाउंडेशन, रोटरी क्लब नागपूर मिहान टाऊन, यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय, एलआयटी महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय-राष्ट्रीय सेवा योजना, इको फ्रेंडली लिविंग फाउंडेशन (लिमये), किंग कोब्रा संघटना, तेजस्विनी महिला मंच, कल्पवृक्ष ट्री फाउंडेशन, लोटस ऑर्गेनायझेशन, प्रभाग निवारण समिती, पारंपारिक मूर्तिकार व हस्तकला कारागीर संघ, बजरंग सेवा समिती साहू समाज यांचा सत्कार करण्यात आला.