उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते जन्मशताब्दी वर्षाचा शुभारंभ
नागपूर :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित होऊन कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांनी सर्वसामान्य जनता आणि बिडी कामगारांसाठी संघर्ष उभारुन अधिकार मिळवून दिले. दादासाहेबांच्या कार्याचे सतत स्मरण राहावे यासाठी विविध लोककल्याणकारी प्रकल्प उभारुन त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे व्हावे, अशा भावना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केल्या. कामठी येथील ड्रॅगन पॅलेस परिसरात आज पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्मवीर दादासाहेब कुंभारे जन्मशताब्दी वर्षाचा शुभारंभ पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार कृपाल तुमाने, राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार चंद्रशेखर बावणकुळे, माजी राज्यमंत्री तथा ड्रॅगन पॅलेसच्या प्रमुख ॲड. सुरेखा कुंभारे, माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे आदी यावेळी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, दादासाहेबांच्या कार्यामुळे जनतेने त्यांना कर्मवीर ही पदवी दिली. कर्मवीर दादासाहेबांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ ही भूमिका आपल्या कर्तृत्वातून चोख बजावत बाबासाहेबांचे अनुयायीत्व सिद्ध केले. उच्च शिक्षण घेऊन दादासाहेबांनी समाज संघटित केला, संघटनेतून संघर्ष निर्माण करुन सामान्यांना न्याय मिळवून दिला. संघर्षातून व बाबासाहेबांच्या विचारातून निर्माण झालेले नेर्तृत्व हे दादासाहेबांच्या कार्यातून दिसून येते. दादासाहेबांच्या कार्याचा वसा त्यांची लेक ॲड. सुरेखा कुंभारे समर्थपणे पुढे नेत आहेत व या कार्यास बळकट करीत आहेत. दादासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्ताने त्यांचे विविध लोककल्याणकारी प्रकल्प राबविण्यात यावे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.
तत्पूर्वी,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ड्रॅगन पॅलेस परिसरात कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. तसेच, त्यांच्या हस्ते ड्रॅगन पॅलेस येथे यात्री निवास, आंतरराष्ट्रीय पर्यटक अतिथीगृह आणि फुड कोर्टचे उद्घाटन करण्यात आले.