संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– अध्यक्षपदी ॲड. अविनाश भिमटे आणि सचिव पदावर ॲड. प्रवीण गजबे विजयी.
कामठी :-नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी, अग्रणी आणि प्रतिष्ठित असलेल्या कामठी वकील संघावर ॲड. डी. सी. चहांदे यांच्या नेतृत्वातील पॅनलने सर्व नऊ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व कायम केले आहे.
कामठी वकील संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीत अध्यक्ष पदाचे उमेदवार ॲड. अविनाश भिमटे यांनी प्रतिस्पर्धी ॲड. महेश फालेकर यांचा तब्बल 67 मतांनी पराभव केला तसेच उपाध्यक्षपदी ॲड. प्रिया मेश्राम आणि सचिवपदी ॲड. प्रवीण गजबे अविरोध निवडून आले आहे. तरसहसचिव पदी ॲड. बासित नियाज हैदरी हे विजयी झाले.
कार्यकारी सदस्यांच्या पाच जागेवर ॲड. डी. सी. चहांदे यांच्या पॅनलचेच ॲड. रीना गणवीर, ॲड. भीमा गेडाम, ॲड. मृणाल भेलावे, ॲड. परीक्षित यादव आणि ॲड. मनोज शर्मा विजयी झाले आहे.
ॲड. डी. सी. चहांदे हे तब्बल २० वर्षे कामठी वकील संघाचे अध्यक्ष होते आणि आता प्रथमच त्यांच्या पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले हे विशेष.
या निवडणुकीत मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. अरुण रामटेके, सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. भूषण तिजारे, ॲड. राजन सोनेकर, आणि ॲड. माधुरी बेलेकर यांनी कामकाज पाहिले.