– गोविंदराव वंजारी फाऊंडेशनचे आयोजन
नागपूर :- नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. अभिजित वंजारी यांच्या पुढाकाराने वर्धा, गडचिरोली आणि भद्रावती येथील पदवीधर बेरोजगारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात विविध क्षेत्रांतील मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. मेळाव्यात राज्यभरातील सुमारे 40 नामांकित कंपन्या, ज्यामध्ये निर्माण, आय.टी., ऊर्जा, ऑटोमोबाईल, बँकिंग अशा क्षेत्रांचा समावेश आहे, सहभागी होणार आहेत.
पदवीधर किंवा पदवी शिक्षण घेत असलेले उमेदवार या मेळाव्यात सहभागी होऊ शकतात. उमेदवारांचा शैक्षणिक क्षेत्र आणि अनुभव पाहून संबंधित कंपन्यांकडून थेट मुलाखती घेऊन त्यांना नियुक्तीपत्र दिले जाईल.
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील बेरोजगार पदवीधारक या मेळाव्यात सहभागी होऊ शकतात. त्यासाठी उमेदवारांनी abhijitwanjari.com या वेबसाईटवर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. सध्या भद्रावती येथील मेळाव्यासाठी तीन हजारांहून अधिक पदवीधरांनी नोंदणी केली आहे. उमेदवारांनी 29 मार्च रोजी संबंधित ठिकाणी शैक्षणिक पात्रतेचे सर्व कागदपत्रे घेऊन उपस्थित राहणे आवश्यक आहे. मुलाखतीसाठी उमेदवारांना दिलेल्या क्रमांकाच्या दालनात त्यांची मुलाखत होईल. याच मेळाव्यात निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात येईल.
गोविंदराव वंजारी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित या मेळाव्याचे उद्घाटन 29 मार्च रोजी सकाळी 10 वाजता आ. अभिजित वंजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. यावेळी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संदर्भात विविध क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
27 मार्च रोजी वर्धा:
राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पवित्र भूमी वर्धा जिल्ह्यात 27 मार्च रोजी सकाळी 10 ते 6 या वेळेत हुतात्मा स्मारकाजवळील चरखा गृह (भवन) येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. वर्धा जिल्ह्यातील 10 हजारांवर बेरोजगार पदवीधारक या मेळाव्यात सहभागी होण्याची शक्यता आहे.
28 मार्च रोजी गडचिरोली:
28 मार्च रोजी सकाळी 10 ते 6 या वेळेत गडचिरोली जिल्ह्यातील महाराजा सेलिब्रेशन हॉल, धानोरा रोड येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात गडचिरोली जिल्ह्यातील 10 हजारांवर बेरोजगार पदवीधारक सहभागी होण्याची शक्यता आहे.
29 मार्च रोजी भद्रावती (चंद्रपूर):
29 मार्च रोजी सकाळी 10 ते 6 या वेळेत भद्रावतीतील स्वागत सेलिब्रेशन येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 10 हजारांवर बेरोजगार पदवीधारक या मेळाव्यात सहभागी होण्याची शक्यता आहे.
आ. अभिजित वंजारी यांनी पदवीधर बेरोजगारांना या मेळाव्यात सहभागी होऊन रोजगाराच्या संधीचा पुरेपूर लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.