मुंबई :- जे. जे. समूह रुग्णालयाच्या आवारातील इमारतींच्या देखभाल दुरुस्तीच्या २०२३ पूर्वीच्या कामांपैकी ९० कामांची देयके देण्यात आली असून निधीच्या उपलब्धतेनुसार पूर्ण झालेल्या उर्वरित कामांची देयके अदा करण्यात येतील, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधान परिषदेत सांगितले.
निवासी डॉक्टरांच्या इमारतीच्या कामाबाबत फेब्रुवारी २०२४ मध्ये प्राप्त झालेल्या तक्रारीवर दक्षता व गुण नियंत्रण मंडळ, नाशिक यांना चौकशीस्तव आदेशित करण्यात आले आहे. त्यांचा चौकशी अहवाल प्राप्त झाल्यावर त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
सदस्य सुनील शिंदे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. सदस्य शशिकांत शिंदे यांनी या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.
मंत्री चव्हाण म्हणाले की, जे. जे. समूह रुग्णालयाच्या आवारात रुग्णालय आणि शासकीय अशा एकूण ९३ इमारती असून ८१ इमारतींना ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. कोरोनाच्या कालावधीत या इमारती २४ तास कार्यरत होत्या. २०२३ पूर्वी या इमारतींच्या देखभाल दुरुस्तीची एकूण ८५० विविध कामे करण्यात आली होती. त्यापैकी ९० कामांची देयके देण्यात आली. २०२३ नंतरच्या कामांच्या देयकांचा यात समावेश नाही, असे त्यांनी सांगितले. या कामांमध्ये ३४ कोटींचा गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारीची देखील चौकशी केली जात असून चौकशीअंती कोणी दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.