भंडारा :- जिल्हा रुग्णालयात बाळ अदलाबदली झाल्याचे व त्याबाबत उपोषणाव्दारे डीएनए चाचणीची मागणी करणारे कोसरे दाम्पंत्यच हे त्या बाळाचे जैविक पालक असल्याचे सिध्द झाले. तसा अहवाल विभागीय न्याय वैदयकीय प्रयोगशाळेने दिल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.दीपचंद सोयाम यांनी दिली आहे.
वसंत कोसरे व मंदा वसंत कोसरे या दाम्पंत्याला 10 ऑक्टोबर 2022 रोजी सामान्य रूग्णालयात मुलगी झाली. त्यानंतर 8 नोव्हेंबर 2022 रोजी वसंत कोसरे यांनी बाळ अदलाबदली झाल्याचे व डीएनए टेस्टची मागणी केली. त्यानुसार शल्यचिकीत्सक कार्यालयाने तीन सदस्यीय समीती चौकशी समिती गठीत केली व अतिरीकत जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार या समितीचा अहवाल कोसरे यांनी 9 डिसेंबर 2022 ला कळविण्यात आला. त्यानंतरही कोसरे यांनी वरीष्ठ पातळीवर तक्रारी केल्याने याबाबत उपसंचालक, आरोग्य सेवा तसेच पोलीस विभागाने सामान्य रूग्णालयाशी पत्रव्यवहार केला व अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केला.
त्यांनतर ही मे-2023 मध्ये अहील्यादेवी होळकर स्त्री शक्ती समस्या समाधाना शिबीरात मंदा वसंत कोसरे यांनी डिएनए चाचणी करीता अर्ज केला. यानुसार महीला व बालविकास विभागाने ही याबाबत शल्य चिकीत्सक कार्यालयाला विचारणा केली. तसेच उपसंचालक आरोग्य सेवा यांनी याबाबत पाठपुरावा केला. उल्लेखीत दाम्पत्यांने 28 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हा कचेरीसमोर उपोषण सुरू केले. अतिरीक्त जिल्हा शल्य चिकीत्सकांनी भेट देवून डिएनए चाचणीची मागणी पुर्ण करत असल्याचे त्यांना कळविण्यात आले.
त्यानुसार पोलीस अधिक्षकांना आई, वडील व बाळ या तिघांची डीएनए टेस्टींग किट उपलब्ध करून देण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला. व तसे पत्र उपोषणकर्त्याला देऊन उपोषण मागे घ्यावे, असे पत्र देण्यात आले. त्यानंतर कोसरे यांनी आरोग्य मंत्री कार्यालयाला चौकशीत दिरंगाई होत असल्याचे पत्र दिले. अवर सचिव कार्यालयाने याबाबत शल्य चिकीत्सकांना संदर्भीय पत्र दिले. एन.पी भाले सहायक रासायनिक परिक्षक, विभागीय न्यायवैदयकीय प्रयोगशाळा, नागपूर यांचे डीएनए चाचणी अहवाल प्राप्त अहवालात वसंत कोसरे व मंदा कोसरे हे कुमारी दिव्यांशी वसंत कोसरे हिचे जैवीक पालक असल्याचे सिध्द झाल्याचे नमुद आहे.