मुंबई :- मंत्रीपदावर पाणी सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड करणारे आमदार बच्चू कडू यांना शिंदे सरकारमधील पहिल्या विस्तारात स्थान मिळालं नाही. बच्चू कडू यांना कॅबिनेट मंत्रीपद हवं आहे. पण सरकारने त्यांना मंत्रिपद दिलं नाही. त्यामुळे बच्चू कडू नाराज असल्याची चर्चा आहे. बच्चू कडू मंत्रिपदासाठी मरमर करत असल्याचीही चर्चा आहे. तसेच बच्चू कडू सत्तेतून बाहेर पडणार का? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे. या सर्व प्रश्नांवर बच्चू कडू यांनी स्वत: उत्तर देऊन सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे.
आमदार बच्चू कडू यांनी टीव्हीला एक्सक्ल्युझिव्ह मुलाखत दिली. यावेळी त्यांनी जनतेच्या मनातील प्रश्न आणि त्यांच्याबाबत सुरू असलेल्या सर्व चर्चांना उत्तरे दिली. मंत्रीपद नाही मिळालं तरी काहीच अडचण नाही. मंत्रिपदासाठी बच्चू कडू मरमर करतात असा काही विषय नाही. पण मंत्रिपद मिळावं ही इच्छा आहे. नाही मिळालं तरी बच्चू कडू काही अस्वस्थ होणार नाही, असं बच्चू कडू यांनी सांगितलं.
मंत्रीपद दिलं तर सोबत. नाही तर नाही. असं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपद देण्याचा शब्द दिला आहे. शिंदे मजबूत आहेत. खमके आहेत. दिलदार आहेत. ते दिलेला शब्द कधी पाडत नाहीत. वर्षावर रात्री 3 वाजता गेलं तरी ते असतात. भेटतात. हा आधार आहे. शिंदेंबद्दल जनतेला आधार मिळत असतो, असं गौरवोद्गारही त्यांनी काढले.
मंत्रिपद नाही मिळालं तर सत्तेतून बाहेर पडणार का? असा सवाल केला असता सरकारमधून बाहेर कशाला पडायचं? पाहू पडायचं की नाही पडायचं. पण पडायची तर इच्छा नाहीये, असं त्यांनी स्पष्ट केलं.
सत्ता परिवर्तन होतच असतं. काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिला तो काय खोक्यासाठी दिला का? न होणारी आघाडी झाली. दोन टोकावरची माणसं एकत्र आली. राजकारणात हे चालूच असतं. हे फार पूर्वीपासूनच सुरू आहे, असं ते म्हणाले.
राजकारण कोण कुणासोबत कसं करतं. हे फार महत्त्वाचं नाही. कोण मुख्यमंत्री आहे या पेक्षा मुख्यमंत्री काय काम करतात हे महत्त्वाचं आहे. निर्णय कडू असू शकतो. पण काम गोड झालं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.