नवी दिल्ली :- सीएए कायद्याबद्दल, अज्ञानमूळक मते व्यक्त करण्यासाठी सार्वभौम व्यासपीठांचा वापर करणाऱ्या प्रवृत्तींविषयी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. सीएए म्हणजेच नागरिकत्व सुधारणा कायदा हा आपल्या शेजारच्या धार्मिक आधारावर छळल्या जाणाऱ्या लोकांना दिलासा देण्यासाठीच लागू करण्यात आला आहे. असे सांगत, ह्या कायद्यामुळे कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेतले जाणार नाही, अशी वस्तुस्थिती असतांनाही, त्याबद्दल दिशाभूल करणारी वक्तव्ये केली जात आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
सीएए कायद्याअंतर्गत, 2014 पूर्वी भारतात आलेल्या पीडितांना नागरिकत्व मिळणार आहे, असं संदर्भ देत उपराष्ट्रपती म्हणाले की, या कायद्याचा लाभ घेण्यासाठी लोकांना आमंत्रित केले जात नाहीये. “या कायद्याचा लाभ कोणाला मिळणार आहे, तर जे आधीच या देशात आहेत त्यांना. ते एका दशकापेक्षाही अधिक काळ भारतात आहेत.” असेही त्यांनी सांगितले.
नवी दिल्लीत, आज अमेरिकन बार असोसिएशनच्या दुसऱ्या स्प्रिंग कॉन्फरन्स मध्ये मुख्य अतिथी म्हणून बोलतांना, धनखड यांनी विविध धर्म, पंथ संप्रदायांच्या शरणार्थी, निर्वासितांना शरण देण्याचा भारताचा इतिहास विशद केला. जे आज आम्हाला उपदेश करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना वस्तुस्थितीचे ज्ञान नाही, त्यामुळे त्यांना ती सांगितली पाहिजे
संसदेपासून पंचायत स्तरापर्यंत भारतात रुजलेली लोकशाही परंपरा अधोरेखित करताना, भारताच्या संस्थांविषयी सार्वभौम व्यासपीठांवरून काही लोकांनी केलेल्या वक्तव्यांवर उपराष्ट्रपतींनी आक्षेप घेतला. “आपण इतरांकडून शिकवण मिळवणारे राष्ट्र नाही”, असे धनखड म्हणाले.
“काही देश आहेत,अनेक व्यासपीठांवरून ते आम्हाला लोकशाही म्हणजे काय हे शिकवू इच्छितात” असा आक्षेप नोंदवत, उपराष्ट्रपतींनी, तरुणांना सोशल मीडिया आणि इतर मंचांवर अशा गोष्टींविरोधात बोलण्यास सांगितले. आपल्या अज्ञानातून आपल्याला धडे शिकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांचे प्रबोधन करण्याचे आवाहन त्यांनी तरुणांना केले.
भारत एकेकाळी जगातील पाच दुर्बल अर्थव्यवस्था असलेल्या देशांपैकी एक होता, तिथपासून ते आज जगातल्या पहिल्या पाच अर्थव्यवस्थापैकी एक पर्यंतच्या आर्थिक प्रवासाचा मागोवा उपराष्ट्र्पतींनी घेतला. आधी सत्तेत असलेल्यांनी देशात केवळ निराशावाद पसरवला, अशी टीका त्यांनी केली.ते पुढे म्हणाले, “जेव्हा या देशात कधीकाळी सत्तेवर असलेली एखादी व्यक्ती, अर्थशास्त्राच्या क्षेत्रात केवळ निराशावाद पसरवते, ते बघणे वेदनादायक आहे” असं ते पुढे म्हणाले.
भारताचे महाधिवक्ता आर. वेंकटरामणी, भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, सोसायटी ऑफ इंडियन लॉ फर्म्सच्या (एसआयएलएफ) अध्यक्षा डॉ. ललित भसीन, ए. बी. ए. च्या इंडिया कमिटीच्या अध्यक्षा प्रतिभा जैन आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.