मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त तथा ठाणे स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर बुधवार दि. 21 आणि गुरुवार दि. 22 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. वरिष्ठ सहायक संचालक मीनल जोगळेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.
ठाणे स्मार्ट सिटी प्रकल्पाला राष्ट्रीय स्तरावर सन्मानित केले आहे. हा प्रकल्प राबविताना केलेल्या कामांची माहिती माळवी यांनी या कार्यक्रमातून दिली आहे. नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सुविधा देणारा हा प्रकल्प ठाणेकरांना दिलासा देणारा आहे. नागरिकांचा सहभाग घेऊन ठाणे स्मार्ट सिटी प्रकल्पाची पायाभरणी केली. नागरिक, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयामुळे प्रकल्पाला कशी गती देण्यात आली, याची माहिती संदीप माळवी यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.