मोर्शी :- अमरावती जिल्ह्यात ड्राय झोन मध्ये असलेल्या वरूड मोर्शी चांदूरबाजार तालुक्यातील जल संधारणाची कामे मोठ्या प्रमाणत करणे गरजेचे असताना या संपूर्ण कामांकडे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा लक्ष देत नसून सुरु आलेली संपूर्ण कामे केली निकृष्ट दर्जाची होत असल्याने ड्राय झोन मुक्तीसाठी होत असलेल्या या शेतकरी हिताच्या अटल भूजल योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमोल गोहाड यांनी जिल्हाधिकारी अमरावती, वरिष्ठ भूवैज्ञानिक अमरावती यांना लेखी स्वरूपात करून सुद्धा संबंधित यंत्रणेचे अधिकारी या तक्रारीकडे दुर्लक्ष करत असल्याने ठेकेदाराकडून करण्यात आलेल्या संपूर्ण कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रसचे जिल्हाध्यक्ष अमोल गोहाड यांनी केला असून संपूर्ण कामांची चौकशी करण्याची मागणी रेटून धरली आहे.
अटल भूजल योजनेमध्ये झालेल्या रिचार्ज शाप्ट नाला खोलीकरनाच्या कामांची चौकशी करून अंदाजपत्रकाप्रमाणे कामांचे मोजमाप करून देण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती तथा जिल्हा अध्यक्ष अटल भुजल समिती अमरावती, व वरिष्ठ भुवैज्ञानिक अमरावती यांना पत्र पाठविले असून सुद्धा कोणत्याच प्रकारची कार्यवाही केल्या गेली नसल्यामुळे या कामांमध्ये मोठ्या प्रमाणत भ्रष्टाचार झाला असल्याची शंका निर्माण होत आहे.
मोर्शी वरुड चांदुरबाजार तालुक्यातील विविध ग्रामपंचायत क्षेत्रातील अटल भूजल योजने मधून रिचार्ज शाप्ट, नाला खोलीकरण चे काम नुकतेच करण्यात आले. परंतु सदर कामे निकृष्ट दर्जाचे असल्याची शंका निर्माण होत आहे. कारण ज्यावेळी काम झाले त्यावेळी ठेकेदाराने स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेता रात्रीच्या वेळी काम केले तसेच मोजमाप करुन दिल्या शिवाय रिचार्ज शाप्ट चे झाकन लावू नये अशी विनंती करण्यात आली होती. परंतु संबंधित कंत्राटदाराने गावकऱ्यांचे म्हणणे ऐकून न घेता काम बंद करून फिल्टर ( दगड ) टाकून झाकून दिले आहेत. कामाचे इस्टीमेट मागितले असता वरिष्ठ भूवैज्ञानिक ते देण्यास टाळाटाळ करत असल्याने कामा बाबत शंका असून ठेकेदाराचे बिल कामाचे मोजमाप केल्या शिवाय काढू नये अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमोल गोहाड यांनी केली आहे. तसेच अटल भुजल योजने मधील जिल्ह्यातील संपूर्ण कामांची हीच परिस्थिती असल्याचे लक्षात येत आहे.
जिल्हाधिकारी व वरिष्ठ भूवैज्ञानिक यांनी या प्रकरणामध्ये जातीने लक्ष घालून संपूर्ण कामांची पाहणी व मोजमाप करून दोषी आढळणाऱ्या कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कार्यवाही करून न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे.