– कापडी पिशव्यांसाठी लावलेल्या विशेष स्टॉलला मनपा कर्मचाऱ्यांचा उदंड प्रतिसाद
– साड्या, चादरी, आदी कापडे केले भरभरून दान
नागपूर :- सिंगल युज्ड प्लास्टिक हे पर्यावरणासाठी घातक आहे. पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणे टाळायला हवे. त्यावर कापडी पिशवी एक उत्तम पर्याय होऊ शकते. याकरिता नागपूर महानगरपालिकेने इको फ्रेंडली लिव्हिंग फाउंडेशन आणि स्वच्छ असोसिएशन या स्वयंसेवी संस्थांसोबत मिळून कापडी पिशव्यांना प्रोत्साहन देण्याचे ठरविले आहे. याचाच एक भाग म्हणून नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील आयुक्त कार्यालयात कापडी पिशव्या तयार करण्यासाठी लागणाऱ्या साड्या, बेडशीट, पडदे आदी कपडे गोळा करण्यासाठी विशेष स्टॉल लावण्यात आला होता. या विशेष स्टॉलला मनपातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उदंड प्रतिसाद दिला.
नागरिकांनी प्लास्टिक पिशवीऐवजी कापडी पिशवीचा वापर सुरू करावा, हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवा म्हणून याची सुरुवात मनपा येथून करण्यात आली. इको फ्रेंडली लिव्हिंग फाउंडेशन आणि स्वच्छ असोसिएशन यांनी लावलेल्या विशेष कपडे संकलन स्टॉलला मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी भेट देत व्यक्तिगत आणलेलं साड्या, बेडशीट, पडदे आदी कपडे आदी कपडे भरभरून दान केले.
राज्य शासनाने प्लास्टिक बंदीचा निर्णय लागू केल्यापासून नागपूर महानगरपालिका हद्दीत प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगणाऱ्या व विक्री करणाऱ्यांवर उपद्रव शोध पथकाच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई केल्या जात आहे. प्लास्टिक बंदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्लास्टिक पिशवी ऐवजी कापडी पिशवीचा वापर सुरू करावा असे आवाहन नागपूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले पूर्वीच केले आहे.
प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची मनपातर्फे काटेकोर अंमलबजावणी केल्या जात असून याकरिता मनापा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात शहरात उपद्रव शोध पथक गठित करण्यात आले आहे. शहरातील नागरिकांनी प्लास्टिक बंदीच्या पार्श्वभूमीवर प्लास्टिक पिशवी ऐवजी कापडी पिशवीचा वापर सुरू करायला हवा, कापडी पिशवी हा प्लास्टिक पिशवीचा चांगला पर्याय ठरू शकतो, तसेच त्यामुळे रोजगार निर्मितीही होते. तसेच या पिशव्यांचा पुन्हा पुन्हा वापार करणे सोईस्कर ठरते. याशिवाय या पिशव्या अत्यंत माफक दारात उपलब्ध होतात. यासंदर्भात माहिती देत इको फ्रेंडली लिव्हिंग फाउंडेशनचे विजय लिमये यांनी सांगितले की, संस्था नागरिकांकडून जून्या वापरलेल्या साड्या, दुपट्टे, बेडशीट, पॅन्ट पीस, शर्ट पीस, पडदे आदी कापड घेऊन त्याच्या पिशव्या तयार करते. या पिशव्याचा पुन्हा पुन्हा वापर होऊ शकतो तसेच या पिशव्या अत्यंत माफक दारात उपलब्ध होतात. त्यामुळे विक्रेते आणि ग्राहक दोघांसाठी फायदेचे आहे. पुढील काळात दोन हजार पिशव्या तयार करण्याचा संस्थेचा मानस आहे. त्यातील १२०० पिशव्यांचा तयार करण्यात आल्या आहेत. या माध्यमातून ७० हुन अधिक गरजू महिलांना रोजगार देखील मिळाला आहे. येत्या काळात तरी नागरिकांनी अधिकाधिक प्रमाणात घरातील साड्या, दुपट्टे, बेडशीट, पॅन्ट पीस, शर्ट पीस, पडदे आदी कापड संस्थेला द्यावे अशी विनंती त्यांनी केली.