मुंबई :- राज्यात शंभर दिवस कृती आराखडा हा व्यापक प्रमाणात यशस्वी ठरला असून या अंतर्गत आतापर्यंत ४११ कामांची कार्यवाही पूर्ण झाली आहे. तर कार्यवाही सुरू असलेली ३७२ कामे आहेत. शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत ८५ टक्के कामे पूर्ण करण्याची कौतुकास्पद कामगिरी विविध विभागांनी केली आहे. येत्या एक मे पर्यंत सर्व कामे पूर्ण करावीत तसेच प्रत्येक विभागाने आपल्या संकेतस्थळावर शंभर दिवस कार्यक्रमाची माहिती उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सह्याद्री अतिथिगृह येथे शंभर दिवस कृती कार्यक्रमाची आढावा बैठक मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संबंधित विभागांचे मंत्री तसेच संबंधित अपर मुख्य सचिव,क्षप्रधान सचिव, सचिव व इतर संबंधित उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रम विभागांनी गांभिर्याने यशस्वी केला. अनेक विभागांनी यामध्ये उत्तम काम केले असून जनतेला या माध्यमातून उपयुक्त आणि तत्पर सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शंभर दिवस कार्यक्रमाचा कालावधी १५ दिवस वाढविण्यात आला आहे. येत्या एक मे रोजी सर्व विभागांनी आपल्या संकेतस्थळावर विभागाने काय ठरवले होते तसेच किती कामे पूर्ण केलीत याची माहिती द्यावी. त्यासोबतच जर काही कार्यवाही अपूर्ण राहिली तर त्याची कारणे ही संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्याच्या सूचना यावेळी संबंधितांना दिल्या.
बैठकीत एकून २६ विभागांच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला. विभागांचे 938 मुद्द्यांपैकी 411 मुद्द्यांवर (44%) पूर्णतः काम झाले आहे. तसेच, 372 मुद्दे (40%) अंतिम टप्प्यात असून निश्चित वेळेत पूर्ण होतील. मात्र, 155 मुद्दे (16%) अद्याप पूर्ण झाले नाहीत. या कामांच्या पूर्ततेबाबत असलेल्या समस्यांची माहिती संबंधित विभागांनी दिली. त्यासाठी त्यांना 15 दिवसांचा अतिरिक्त कालावधी देण्यात आला आहे. सर्व विभागांनी कामे पूर्ण करुन एक मे ला त्याची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्याचे मुख्यमंत्री यांनी निर्दशित केले.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत विभागांनी गतीमान काम करुन लोकाभिमुख कार्यपद्धतीचा अनुभव जनतेला दिला आहे, त्यातुन शासनाप्रती जनतेमध्ये चांगला दृष्टीकोन तयार होत आहे. अनेक प्रकल्प, मोठे कामे या शंभर दिवसाच्या कालावधीत करण्यात येत आहेत, अनेक पूर्ण झाली आहेत. त्यासोबत अनेक विभागांच्या सेवा ऑनलाईन आल्या आहेत, त्याचा जनतेला विशेष लाभ होत आहे, या सर्व उत्तम कामगिरीसाठी शिंदे यांनी विभागांचे अभिनंदन केले.