– विक्रमी उत्पादन आणि निर्यात हे संरक्षण क्षेत्रातल्या मोठ्या विकासाचे द्योतक”
– राजनाथ सिंह यांनी इंडिया @2047 संदर्भातील आपला दृष्टिकोन केला स्पष्ट
नवी दिल्ली :-“भारत ही उदयोन्मुख नव्हे तर पुनरुत्थान करणारी शक्ती असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जागतिक आर्थिक नकाशावर देश आपले स्थान पुन्हा प्राप्त करत आहे,” असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 02 जून 2023 रोजी नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात बोलताना सांगितले. 17 व्या शतकापर्यंत भारताची अर्थव्यवस्था लक्षणीयरीत्या मजबूत होती, जी जागतिक सकल उत्पादनाच्या एक चतुर्थांश होती. परंतु कमकुवत लष्करी धोरण आणि राजकीय गुलामगिरीमुळे देशाने आपले वैभव गमावले, असे संरक्षण मंत्र्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच सांगितले.
भारताला त्याचे प्राचीन गौरवशाली स्थान पुन्हा प्राप्त व्हावे यासाठी सरकार या दोन्ही आघाड्यांवर काम करत आहे, असे संरक्षण मंत्र्यांनी जोर देऊन सांगितले. देशांतर्गत अत्याधुनिक शस्त्रे/ उपकरणे बनवणाऱ्या मजबूत संरक्षण उद्योगाच्या पाठीशी एक मजबूत, तरुण आणि तंत्रज्ञानाची जाण असलेले सशस्त्र दल तयार करण्यासाठी कोणतीही कसर सोडली जात नसल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच वसाहतवादी मानसिकतेपासून मुक्ती मिळवण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत, असे त्यांनी सांगितले.
“एक मजबूत सैन्य दल केवळ सीमा सुरक्षित करत नाही तर देशाच्या संस्कृती आणि अर्थव्यवस्थेचेही रक्षण करते. आपल्या समोर स्वतःच्या गरजा तसेच मित्र देशांच्या गरजा पूर्ण करणारे एक मजबूत, स्वावलंबी आणि समृद्ध राष्ट्र निर्माण करण्याचे ध्येय आहे, असे ते म्हणाले. हा नवजागरणाचा काळ आहे. भारताला जागतिक महासत्ता म्हणून पुन्हा प्रस्थापित करण्याची वेळ आली आहे,” असे राजनाथ सिंह म्हणाले.
2013 मध्ये भारताचे नाव ‘नाजूक 5’ अर्थव्यवस्थांमध्ये समाविष्ट केले होते असे संरक्षण मंत्र्यांनी मॉर्गन स्टॅन्लेच्या अहवालाचा हवाला देत सांगितले. मात्र 2027 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल, असे अलीकडेच या गुंतवणूक फर्मने म्हटल्याचे त्यांनी सांगितले. अलिकडच्या वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास झाल्याचा हा ठोस पुरावा असल्याचे ते म्हणाले. ‘उदयोन्मुख शक्ती’ हा वाक्प्रचार भारतासाठी तात्कालिक दृष्टीकोनातून वापरला जाऊ शकतो, परंतु दीर्घकाळासाठी आपण जगाच्या आर्थिक नकाशावर पुन्हा स्थान मिळवणारी पुनरुत्थान शक्ती असल्याचे आपण मानतो असेही ते म्हणाले.
शस्त्रे आणि तंत्रज्ञानाच्या निर्मितीमध्ये संपूर्ण ‘आत्मनिर्भरता’ साध्य करण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत, असे संरक्षण मंत्र्यांनी संरक्षण क्षेत्रात गेल्या काही वर्षांत झालेल्या परिवर्तनीय बदलांबद्दल माहिती देताना सांगितले. या प्रमुख निर्णयांमध्ये सशस्त्र दलांच्या वतीने 411 वस्तूंच्या चार सकारात्मक स्वदेशीकरण याद्या आणि संरक्षण विभाग सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसाठी 4,666 वस्तूंच्या चार इतर याद्या, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये संरक्षण औद्योगिक कॉरिडॉरची स्थापना यांचा समावेश आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
2022-23 या आर्थिक वर्षात एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त संरक्षण उत्पादन आणि जवळपास 16,000 कोटी रुपयांची आजवरची सर्वात जास्त संरक्षण निर्यात हे संरक्षण क्षेत्राचा मोठ्या प्रमाणावर झालेल्या विकासाचे द्योतक आहेत, असे राजनाथ सिंह यांनी सरकारच्या प्रयत्नांमुळे झालेल्या सकारात्मक परिणामांवर प्रकाश टाकताना सांगितले. सरकारने तयार केलेल्या स्टार्ट-अप स्नेही परिसंस्थेमुळे देशात 100 हून अधिक युनिकॉर्न तयार झाले आहेत तसेच संरक्षण संशोधन आणि विकास आणि उत्पादन क्षेत्रात स्टार्ट-अपच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.
राजनाथ सिंह यांनी भारत@2047 बाबतीत त्यांचा दृष्टिकोन स्पष्ट केला. यामध्ये एक मजबूत सरकारी यंत्रणा उभारणी; प्रत्येक गरजू व्यक्तीला मदत; सामाजिक सुसंवाद; महिलांचा समान सहभाग आणि अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण करणारी परिसंस्था यांचा समावेश असल्याचे ते म्हणाले.