अरोली :- सध्या शेतकऱ्यांचे शेतपिक निघायला सुरुवात झाली असून सर्वच शेतमालाला अत्यंत कमी भाव असून रासायनिक खत व मजुरीचे दर दरवर्षी वाढत असताना शेतमालाचे भाव मात्र यंदा मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी असल्याने शेतमाल पिकवण्यासाठी लावलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी चिंतातूर झालेला असून शेतमालाचे भाव वाढविण्याची कळकळीची मागणी खंडाळा (पिपरी ) येथील सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी देवेंद्र कोगे सह मौदा तालुक्यातील गावागावातील शेतकऱ्यांनी केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मागच्या वर्षी धानाला पाच हजार रुपये खंडी (दीड क्विंटल ) भाव मिळाला, तर यंदा 4 हजार रुपये म्हणजेच मागच्या वर्षीच्या तुलने हजार रुपये कमी, तसेच हिरव्या मिरचीला मागच्या वर्षी शेवटच्या तोळ्यापर्यंत चांगला भाव मिळाल्याने म्हणजेच सरासरी 40 ते 45 रुपये प्रति किलो मिळाला, मात्र यंदा पावसाचे प्रमाण जास्त असल्याने हिरव्या मिरचीचे झाडे मोठ्या प्रमाणात नष्ट झाल्याने उत्पादन कमी होत आहे, सुरुवातीला ऑक्टोबर ,नोव्हेंबर महिन्यात उत्पादन कमी असूनही हिरव्या मिरचीचे रेट 70 ते 80 रुपये प्रति किलो असल्याने शेतकऱ्यांच्या झालेला खर्च निघत होता .मात्र शासनाने हिरव्या मिरचीवर निर्यात बंदी केल्याने मागील नोव्हेंबर महिन्यापासून ते आता 19 डिसेंबर पर्यंत हिरव्या मिरचीचे रेट 10 ते 17 रुपये दरम्यानच असल्याने, शेतकऱ्यांच्या खर्चही निघत नसल्याचे धर्मापुरी येथील शेतकरी शिवदास मदनकर व नवरगाव येथील शेतकरी व गट ग्रामपंचायत धर्मापुरी चे माजी उपसरपंच लटारू बावनकुळे यांनी सांगितले. त्यामुळे हिरवी मिरची उत्पादक शेतकरी अत्यंत चिंतातूर झालेला आहे. हिरव्या मिरचीला भाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी हिरव्या मिरचीचा तोडा बंद केलेला होता, मात्र मिरचीच्या झाडावरची हिरवी मिरची लाल झाल्यावरही भाव मात्र शेतकऱ्यांना मालामाल करणारा होत नसल्याने नसल्याने, झाड खराब होण्याच्या भीतीने नाईलाजास्तव शेतकऱ्यांना त्यांची हिरवी मिरची न परवडणाऱ्या दरात विकावी लागत आहे.
त्यामुळे सध्या हिवाळी अधिवेशनासाठी आलेल्या संबंधित मंत्र्यांनी धानाचे भाव 5000 प्रति खंडीच्यावर, हिरव्या मिरचीचे दर प्रति किलो 30 रुपेच्या वर, तुरीचे दर दहा हजार ते 11000 प्रति क्विंटल दरम्यान, सोयाबीनचे दर 8000 ते 9000 प्रति क्विंटल दरम्यान तर गव्हाचे दर 3000 प्रति क्विंटल च्या वर करण्यासाठी, हिरव्या मिरची वरील निर्यात बंदी हटविण्यासाठी संबंधित यंत्रणेला निर्देश द्यावे अशी मागणी खंडाळा(पिपरी) येथील सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी देवेंद्र कोंगे, धर्मापुरी येथील शेतकरी शिवदास मदनकर, नवरगाव येथील शेतकरी लटारू बावनकुळे, अडेगांव येथील शेतकरी बबलू ठाकूर, पवन कुथे, प्रशांत भैसारे, नवसाद सिंह, मोहन टेकाम, दामू दुनेदार ,ढोलमारा येथील शेतकरी प्रदुम चामट, हिराबाई चामट , अनुसया चामट सह मौदा तालुका अंतर्गत येत असलेल्या 126 गावातील शेतकऱ्यांनी केली आहे.