यवतमाळ :- राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पांतर्गत भारतीय स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयामार्फत आयोजित करण्यात आलेल्या जल साक्षरता व पाण्याचा कार्यक्षम वापर या बाबतच्या चित्ररथाचा शुभारंभ पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या शुभारंभाप्रसंगी पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी, अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, वरिष्ठ भूवैज्ञानिक हिमा जोशी आदी उपस्थित होते.
चित्ररथाचा उद्देश जनसामान्यांमध्ये जलसाक्षरता व पाण्याचा कार्यक्षम वापर याबाबत भूजल जनजागृती करणे हा आहे. सदर चित्ररथाद्वारे प्रामुख्याने विहीर पुनर्भरण, विंधन विहीर, कुपनलिका पुनर्भरण याद्वारे भूजलाचे पुनर्भरण व पिण्याच्या पाण्याची रासायनिक व जैविक पाणी गुणवत्ता याबाबत ग्रामस्तरावर चित्ररथ फिरवून जनजागृती करण्यात आली.
चित्ररथाची संकल्पना भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक हिमा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ भूवैज्ञानिक एम. एस गवळी यांनी तयार केलेली असून याकरीता भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतील सर्व कर्मचाऱ्यांचे योगदान लाभले.